एक्स्प्लोर
Advertisement
फिरकीसमोर विंडीज संघ ढेपाळला, अश्विनचा भीम पराक्रम
अँटिगा: रविचंद्रन अश्विननं शॅनॉन गॅब्रियलचा त्रिफळा उडवला आणि विराट कोहलीच्या टीम इंडियानं विंडीज दौऱ्याची सुरुवात अपेक्षेप्रमाणे विजायनंच केली. अँटिगा कसोटीत भारतानं वेस्ट इंडिजचा एक डाव आणि 92 धावांनी धुव्वा उडवला. भारताचा आशिया खंडाबाहेरचा हा सर्वात मोठा विजय ठरला.
टीम इंडियाच्या विजयाचा शिल्पकार ठरला तो रविचंद्रन अश्विन. अश्विनच्या फिरकी माऱ्यासमोर विंडीज फलंदाजांनी दुसऱ्या डावात अक्षरश: नांगी टाकली. रविचंद्रन अश्विनला पहिल्या डावात एकही विकेट मिळाली नव्हती. पण दुसऱ्या डावात त्यानं सर्व कसर भरुन काढली.
अश्विननं 25 षटकांत 83 धावांच्या मोबदल्यात विंडीजच्या सात फलंदाजांना माघारी धाडलं. अश्विनची कसोटी कारकीर्दीतली ही दुसरी सर्वोत्तम कामगिरी ठरली. तर आशिया खंडाबाहेर अश्विननं पहिल्यांदाच पाचहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला.
अश्विनच्या प्रभावी माऱ्यामुळं वेस्ट इंडिजचा दुसरा डाव अवघ्या 231 धावांवर आटोपला. अश्विननं गोलंदाजीसह फलंदाजीतही आपली जबाबदारी चोखपणे पार पाडली. पहिल्या डावात अश्विननं 113 धावांची खेळी करुन भारताला मजबूत स्थितीत नेऊन ठेवलं होतं. याच अष्टपैलू कामगिरीसाठी त्याला सामनावीराच्या पुरस्कारानंही गौरवण्यात आलं.
एकाच कसोटी सामन्यात शतक झळकावून पाच किंवा त्याहून अधिक विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवण्याची अश्विनची ही आजवरची दुसरी वेळ आहे. अशी कामगिरी करणारा अश्विन हा पहिलाच भारतीय खेळाडू ठरलाय. याआधी अश्विननं 2011 साली मुंबईत झालेल्या वेस्ट इंडिजविरुद्धच्याच सामन्यात असा कारनामा करुन दाखवला होता.
रविचंद्रन अश्विनसह मोहम्मद शमी आणि उमेश यादव या वेगवान गोलंदाजांनीही प्रभावी मारा करुन भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. या सामन्यात मोहम्मद शमीनं चार, तर उमेश यादवनं पाच विकेट्स काढल्या.
भारतीय गोलंदाजांनी विंडीजच्या वीस विकेट्स काढून भारताच्या विजयाचा कळस चढवला. पण भारताच्या या विजयाचा पाया घातला तो कर्णधार विराट कोहलीनं. विराट कोहलीनं पहिल्या डावात 283 चेंडूंत 24 चौकारांसह 200 धावांची खेळी उभारली होती. त्यामुळं भारताला 566 धावांची मजल मारता आली.
भारतानं हा सामना जिंकला खरं, पण कर्णधार कोहली आणि प्रशिक्षक कुंबळे या जोडगोळीसह टीम इंडियाच्या खेळाडूंनी डिस्टिंक्शन मिळवलं. भारताच्या तुलनेत वेस्ट इंडिजचा संघ हा दुबळा असला तरी त्यांच्यात गुणवान खेळाडूंचाही समावेश आहे. तसं क्रिकेटच्या मैदानात कुठलीही गोष्ट ग्राह्य धरुन चालत नाही आणि कोहली-कुंबळे या जोडगोळीनंही गाफिल राहण्याची चूक केली नाही.
अँटिगातल्या पहिल्या कसोटीत विराट कोहलीच्या टीम इंडियानं आपल्या लौकिकाला साजेशी कामगिरी केली. आता मालिकेतल्या उरलेल्या तीनही सामन्यात टीम इंडियाकडून अशाच दमदार कामगिरीची अपेक्षा केली जाते आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement