दोन शिवसेना एकत्र आलेल्या बार्शीत भाजपची जोरदार मुसंडी; राजेंद्र राऊतांकडून व्हाईट वॉश, सोपलांचा मोठा पराभव
बार्शीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा भाजपने ताब्यात घेत ठाकरे गटाचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांचा बार्शीत दारुण पराभव केला.

सोलापूर : राज्यात दोन शिवसेना एकत्र आल्याने लक्षवेधी आणि चर्चेत आलेल्या बार्शी (Barshi) तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपने व्हाईट वॉश विजय मिळवला. भाजप नेते राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात बार्शीतील जिल्हा परिषदेच्या (ZP) 6 आणि पंचायत समितीच्या 12 जागां जिंकत महाआघाडीचा सुपडा साफ करण्यात आला. विशेष म्हणजे, राजेंद्र राऊत यांच्याकडे गेल्या 20 वर्षांपासून येथील पंचायत समिती ताब्यात असून यंदा 5 व्यांदा विजय मिळवत राऊतांनी आपला विधानसभेचा पराभव पुसून टाकला. विधानसभेच्या पराभवानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती, नगरपालिका आणि आता जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुकांमधील राऊतांचं यश कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवणारं आहे. तर, या निवडणूक निकालामुळे पहिल्यांदाच येथील ग्रामीण भागात भाजपचे (BJP) कमळ खुलले आहे.
बार्शीत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या सर्वच्या सर्व जागा भाजपने ताब्यात घेत ठाकरे गटाचे विद्यमान आमदार दिलीप सोपल यांचा बार्शीत दारुण पराभव केला. माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या नेतृत्वात बार्शीतील जिल्हा परिषदच्या 6 पैकी 6 आणि पंचायत समितीच्या 12 पैकी 12 जागांवर विजय मिळवत पहिल्यांदाच बार्शी तालुक्यात झेडपी आणि पंचायत समितीवर भाजपची सत्ता स्थापन केली आहे. विशेष म्हणजे, भाजपा विरोधात दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आणत दिलीप सोपल यांनी महाआघाडी स्थापन केली होती. महाआघाडीच्या निवडणूक प्रचारासाठी उपमुख्यमंत्र एकनाथ शिंदे बार्शीत आले होते, त्यांची सभाही जोरदार झाली. त्यांच्या सभेनंतर 2 तासांतच त्यांनी अडीच कोटींचा निधी देखील मंजूर केला होता. मात्र, भाजप विरोधात सर्वपक्षीय आघाडी असताना देखील अक्षरशः महाआघाडीचा सुपडा साफ झालाय.
राजेंद्र राऊत यांनी गावपातळीवर निर्माण केलेलं संघटन, बेरजेचं राजकारण, विकासाच्या मुद्द्यावर केलेला प्रचार आणि विधानसभा निवडणुकानंतर त्यांच्या भूमिकेत झालेला बदल येथील जनतेला भावला. तसेच, मुख्यमंत्र्यांकडून देण्यात आलेली ताकदही त्यांच्यासाठी महत्त्वाची ठरली. याशिवाय राजेंद्र राऊत यांचे सुपुत्र आणि भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांनी युवकांची बांधलेली मोट, बाजार समितीच्या चेअरमनपदी असताना गावागावात निर्माण केलेल्या संघटनात्मक बांधणीतून जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये निर्वावाद वर्चस्व मिळवण्यात राऊत गटाला आणि पर्यायाने भाजपला यश मिळालं.
दरम्यान, या अभूतपूर्व विजयानंतर माजी आमदार राजेंद्र राऊत यांनी जनतेचे आभार मानले आहेत. तसेच, जनतेचे आभार व्यक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः बार्शीत येणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली

























