Zero Hour : कुठे नेऊन ठेवलीये राजकीय संस्कृती! पडळकर, आव्हाडांच्या समर्थकांमध्ये राडा
दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे
जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों
झिरो अवरमध्ये आपलं स्वागत. मी प्रसन्न जोशी. नमस्कार. बशीर बद्र साहेबांचा हा शेर आजच्या विषयाचं सार, संदेश आणि सूत्रही आहे. उत्तर भारत किंवा दक्षिण भारताच्या राजकारणात जीवघेणी दुष्मनी निभावली जाते, एकमेकांचं नाव टाकलं जातं. जयललिता यांनी करुणानिधींना रात्री २ वाजता फरफटत नेण्याची दृष्य असोत, इंदिरा गांधींनी साक्षात जयप्रकाश नारायण यांचा "एक जना..." म्हणजे एक जण किंवा त्यांच्या नावाची अद्याक्षरे घेऊन केलेली टिपण्णी असो, २०१४पासून दर निवडणुकीत काँग्रेसच्या लोकांनी मोदींवर केलेली किंवा भाजपच्या समर्थकांनी राहुल गांधींवर केलेली विधाने, असे अनेक दाखले भारताच्या राजकारणातले दाखवता येतील. मात्र, महाराष्ट्र या राजकीय होळीतही सदैव तळपत्या सूर्यासारखा वेगळा भासला. इथं, सत्ताधारी विरोधक एकमेकांच्या कार्यक्रमात सहभागी होतात, वाद विसरुन एकत्र येतात. कालच झालेल्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या निरोप समारंभात झालेल्या भाषणातही याच राजकीय संस्कृतीचा प्रत्यय आला.
मात्र, महाराष्ट्राचं हे चित्र वेगानं बदलतंय. राजकीय पक्ष आणि नेत्यांच्या समर्थकांच्या सोशल मीडियावरील घाणेरड्या भाषेनंतर आता नेते मंडळीही भान आणि जबाबदारी विसरु लागलीयेत असं दिसतंय. याची साक्ष देणारा घटनाक्रम काल-परवापासून ते आज आणि अगदी आत्ताच्या घडीला विधीमंडळ परिसरात चालू आहे. याला निमित्त ठरलाय तो भाजप आमदार गोपीचंद पडळकर आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाडा यांच्यातला राडा. याची सुरुवात कुठे झाली, हा प्रश्न महत्त्वाचा नाही. मात्र, दोन्हीकडून वाद वाढतच जाईल अशा कृती आणि वक्तव्ये केली गेली हे समोर आहे. विधीमंडळात बाहेर जसं कॅज्युअली वागतात तसं वागू नये, हे साधं तत्व असताना आव्हाडांनी पडळकर माध्यमांशी बोलत असताना मंगगळसूत्र चोराचा अशा घोषणा देणं असेल, गाडी लावण्यावरुन पडळकरांनी आव्हाडांना उद्देशून वापरलेल भाषा असेल ते आज विधीमंडळाच्या लॉबीत पडळकर-आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेली हाणामारी असेल. हा एकूणच प्रकार काट्याचा नायटा होण्याच्या दिशेने चाललाय अशी स्थिती आहे. दुर्दैवानं सत्ताधारी किंवा विरोधकांकडे देवेंद्र फडणवीस, राहुल नार्वेकर, एकनाथ शिंदे, अजित पवार किंवा उद्धव ठाकरे, वडेट्टीवार, जयंत पाटील, शरद पवार असे नेते असूनही त्यांना हे वातावरण शांत करता येत नाहीये. अशानं आधीच सोशल मीडियावरचा दोन्ही बाजूकडचा चिखल आता गटार बनून सगळीकडे वाहणार का? सवाल आहे. यावरच आहे आजचा झिरो अवरचा प्रश्न...
All Shows





महत्त्वाच्या बातम्या




























