Zero Hour Sharad Pawar Ajit Pawar Meet : शरद पवारांचा वाढदिवस... दादांची भेट; राष्ट्रवादीत मनोमिलन?
तुम्ही पाहाताय एबीपी माझा आणि एबीपी माझावर सुरुय झीरो अवर.
मंडळी, शिवसेनेपाठोपाठ शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आणि महाराष्ट्रात दुसरा भूकंप झाला. अजित पवारांच्या नेतृत्त्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचा एक मोठा गट महाविकास आघाडीतून सत्ताधारी महायुतीत सामील झाला होता. हा सारा घटनाक्रम आणि त्यानंतर पक्ष आणि पक्षचिन्ह अजित पवारांच्या राष्ट्रवादीला मिळालं तो इतिहास तुम्हालाही एव्हाना तोंडपाठ झाला असावा.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पडलेल्या या फुटीचे पडसाद केवळ राज्याच्या राजकारणात उमटतील असं वाटलं होतं. पण लोकसभा निवडणुकीत अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी बारामतीतून लोकसभेची निवडणूक लढवली आणि पवार कुटुंबीयांमध्येही उभी फूट पडली. लोकसभा निवडणुकीत नणंद भावजय म्हणजे सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराच्या निमित्तानं वादाच्या ठिणग्याही उडाल्या.
मग विधानसभा निवडणुकीत पवार कुटुंबीयांमधल्या राजकीय दुहीचा दुसरा अंक पाहायला मिळाला. अजित पवार आणि युगेंद्र पवार या काकापुतण्याच्या लढाईनं पवार कुटुंबीयांची दिवाळी वेगवेगळी साजरी झाली. शरद पवार यांच्यासोबतच्या पवार कुटुंबीयांनी बारामतीच्या गोविंदबागेत दिवाळी साजरी केली, तर अजितदादांसोबतच्या पवार कुटुंबीयांनी काटेवाडीत दिवाळीचा आनंद लुटला.
या साऱ्या घडामोडी अवघ्या महाराष्ट्रानं उघड्या डोळ्यांनी पाहिल्यायत. पण तरीही आम्ही त्या पुन्हा सांगतोय याचं कारण शरद पवारांच्या ८४व्या वाढदिवसाच्या निमित्तानं आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेली त्यांची भेट. आणि विशेष म्हणजे काका-पुतण्याच्या या भेटीच्या निमित्तानं केवळ पवार कुटुंबच नाही, तर राष्ट्रवादीचा परिवारही दिल्लीतल्या सहा जनपथवर एकवटला होता.
अजित पवारांसह त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांनीही शरद पवारांची भेट घेऊन त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. त्याचवेळी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते छगन भुजबळ या जुन्या सहकाऱ्यांनीही थोरल्या पवारांचं अभिष्टचिंतन केलं.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दहा दिवसांआधीही शरद पवारांची भेट घेतली होती. शरद पवारांच्या दिल्लीतल्या सहा जनपथ या निवासस्थानी ही भेट झाली होती. विशेष म्हणजे अजित पवार दिल्लीत असतानाच ही भेट झाली होती. पण या दोन भेटींची सध्या तरी सांगड घालता येत नाहीय
कारण शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त आज झालेली भेट ही महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीचं दर्शन घडवणारी आणि यशवंतराव चव्हाण यांनी घालून दिलेल्या परंपरा आणि आदर्शांचं पालन करणारी होती, असं अजित पवारांनी म्हटलं आहे.