Madhuri Dixit on Majha Katta :धकधक गर्ल डॉ. नेनेंच्या प्रेमात कशी पडली? माधुरीने सांगितली Love Story
जी माणसं आपल्या फार जवळची असतात, त्या माणसांनी यशाची कितीही शिखरं गाठली, तरी आपण त्यांचा उल्लेख एकेरी करतो कारण एकेरी हाकेतला आपलेपणा कायमच जवळचा वाटतो. अशीच एक व्यक्ती आज कट्ट्यावर आली आहे, जी गेल्या कित्येक दशकांपासून करोडो ह्रदयांवर अधिराज्य गाजवतेय..
जिच्या निव्वळ मागे वळून पहाण्यानं अनेकांच्या काळजाचा ठोका चुकवला. जिने तुम्हा आम्हाला घातलेली मोहिनी दशकांच्या प्रवासानंतरही विरलेली नाही. जिच्या डोळ्यांतही गाणी आहेत, भुवईतही नृत्य आहे, कटाक्षातही अर्थ आहे, जिचा अभिनय म्हणजे बावनकशी सोनं आणि जिचं हसणं म्हणजे कोजागिरीचं चांदणं अर्थात् माधुरी दिक्षित आणि त्यासोबतच
असंख्य काळजांचा ठोका चुकवणाऱ्या माधुरीच्या काळजाचा ठोका ज्यांना पाहून चुकला, स्वतः ह्रदयरोग तज्ज्ञ असूनही, ज्यांच्यामुळे माधुरीच्या तमाम चाहत्यांना कायमचा ह्रदयविकार जडला ते माधुरीचे पती डॉ. श्रीराम नेने. ते स्वतः निष्णात ह्रदयविकार तज्ज्ञ आहेत, पण माणसाच्या ह्रदयाचा मार्ग पोटातून जातो या उक्तीमुळेच कदाचित, गेल्या काही दिवसांत त्यांनी युट्युबच्या माध्यमातून आपलं पाककौशल्य दाखवायला सुरुवात केली आहे.दोन वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे हे दोघे पंचक या सिनेमाच्या निमित्ताने सिनेक्षेत्रात निर्माते म्हणून एकत्र आलेत. आज कट्ट्याच्या निमित्ताने माधुरी आणि श्रीराम नेने यांच्याशी दिलखुलास गप्पा मारताना सिनेमाबद्दल तर जाणून घेऊयाच.