Ayurvedic vs Allopathy : आयुर्वेदावर विश्वास न बसण्याच नेमकं कारण काय? Dr. Balaji Tambe सांगतात...
मुंबई : आयुर्वेद, योग व संगीतोपचार या विषयांतील तज्ज्ञ डॉ. बालाजी तांबे आज माझा कट्टा या विशेष कार्यक्रमात सहभागी झाले होते. आयुर्वेदाशी संबंधित संशोधनावर त्यांना भर दिला. आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांनी आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केले आहे. बालाजी तांबे यांनी मेकॅनिकल इंजिनीअरचीही डिग्री घेतली आहे.
सध्या जगभर सुरू असलेल्या कोरोना व्हायरसच्या संकटावर बोलताना बालाजी तांबे यांनी म्हटलं की, कोरोनावर आपण लस शोधू, औषधे शोधू, मास्क लावू सगळी काळजी घेऊ, मात्र आपल्या मेंदूतला (डोक्यातला) व्हायरस जात नाही म्हणजे मनाची भीती जात नाही तोवर हा कोरोना व्हायरस जाणार नाही. गेल्यावर्षी फेब्रुवारी महिन्यात कोरोनाची माहिती मिळाली. इतर काही देशांमध्ये कोरोनाचा प्रसार सुरू होता. त्यावेळी कोरोनाचा सामना करण्यासाठी त्याचा अभ्यास करून एक चहा आणि एक काढा आम्ही तयार केला. खबरदारी म्हणून तो सर्वांना देण्यास सुरुवात केली आणि मार्च महिन्यात कोरोनाची स्थिती भयंकर बनल्यानंतर आमच्या चहा आणि काढ्याचे सॅम्पल्स आम्ही एफडीआयला पाठवले. एफडीआयकडून मंजुरीनंतर ते चहा आणि काढा लोकांना देण्यास सुरुवात केली, असं बालाजी तांबे यांनी सांगितले. लॉकडाऊनमुळे अनेक परदेशी रुग्ण येथे त्यावेळी अडकले होते. मात्र ज्यावेळी ते मायदेशी गेले तेव्हा त्यांनी मोठ्या प्रमाणात चहा आणि काढा सोबत नेला. या चहा काढ्याला त्यांच्या देशातही कुणी विरोध केला नाही, असं बालाजी तांबे यांनी सांगितलं.
मध्यंतरी अॅलोपॅथी आणि आयुर्वेद यावरून सुरू असलेल्या वादावर त्यांनी भाष्य केलं. आयुर्वेदावर अद्यापही विश्वास ठेवला जात नाही. यावर बोलताना बालाजी तांबे सांगतात, पैशाने सर्व काही जिंकता येत नाही. अॅलोपॅथीच्या काही औषधांतही काही त्रुटी आहेत. मात्र आयुर्वेदाच्या डॉक्टरांना साधी प्रॅक्टिसची सुद्धा परवानगी दिली जात नाही. आयुर्वेदावर अनेक बंधने लादली गेली आहेत. त्यामुळे अॅलोपॅथी प्रमाणे आयुर्वेद सर्वांपर्यंत पोहोचलं नाही. आयुर्वेदाबाबत सांगताना, जर्मनीत आमचं सेंटर आहे, जर्मनीत त्यांना आयुर्वेद हवा आहे, मात्र सरकारची अडचण होऊ नये म्हणून त्यांनी 'आयुजेनोमिक्स' ही कॉन्सेप्ट सुरू केली आहे. आमच्या औषधांवर तेथे संशोधन सुरू आहे. आमची औषधे तेथील चाचण्यांमध्ये पास झाली तर तिथून आम्हाला रॉयल्टी दिली जाणार आहे, अशा प्रकारे त्यांनी आयुर्वेदाचं महत्त्व अधोरेखित होईल. मात्र जगरभरात आयुर्वेदाची मागणी वाढली तर त्याचं महत्त्व वाढेल आणि याला ज्यांचा विरोध होता ते पुढे आले, असं बालाजी तांबे यांनी सांगितलं.