WhatsApp : 'व्हॉटसअॅपवर प्रायव्हसी हवी असेल तर फेसबुक अकाऊंट डिलीट करा'
WhatsApp : व्हॉटसअॅपवर प्रायव्हसी हवी असेल तर फेसबुक अकाउंट डिलीट करा, असे फेसबुकच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात सुनावणी दरम्यान सांगितले.
WhatsApp : जर तुम्हाला व्हॉट्सअॅपवर प्रायव्हसी हवी असेल तर फेसबुक अकाउंटच डिलीट करा, असा युक्तिवाद फेसबुकच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला आहे. व्हॉट्सअॅप युजर्सचा फक्त काही डेटा फेसबुकवर शेअर केला जातो आणि जर वापरकर्त्यांना संपूर्ण गोपनीयता हवी असेल तर त्यांनी फेसबुकवर खाते न ठेवता व्हॉट्सअॅप वापरावे, असे ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी कोर्टात सांगितले.
फेसबुक-व्हॉट्सअॅपच्या प्रायव्हसी धोरणावरून सुप्रीम कोर्टात बुधवारी सुनावणी झाली. त्यावेळी फेसबुकच्यावतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला. व्हॉटस अॅपच्या 2016 मधील प्रायव्हसी धोरणाला याचिकेतून आव्हान देण्यात आले आहे. फेसबुकने 2014 मध्ये व्हॉट्सअॅप खरेदी केल्यानंतर 2016 पर्यंत व्हॉट्सअॅप युजर्सचा डेटा वेगळा ठेवला होता. त्यानंतर 2016 मध्ये व्हॉट्सअॅप आणि फेसबुकने प्रायव्हसी धोरणात बदल केला. जेणेकरून मेटा डेटा (युजर्सचा फोन क्रमांक) हे दोन्ही अॅपमध्ये शेअर केले जाऊ शकतात.
कोणती माहिती शेअर केली जाते
सुप्रीम कोर्टात न्या. केएम जोसेफ, न्या. अजय रस्तोगी, न्या. अनिरुद्ध बोस, न्या. हृषिकेश रॉय आणि न्या. सी. टी. रवी कुमार यांच्या खंडपीठासमोर झालेल्या सुनावणीदरम्यान व्हॉट्सअॅपने न्यायालयाला सांगितले की, व्हॉट्सअॅप वापरकर्त्यांचे कोणते मोबाइल नंबर व्हॉट्सअॅपवर केव्हा आणि कसे नोंदवले गेले. ते ऑपरेट करतात, फक्त त्याची माहिती सामायिक केली जाते. याशिवाय इतर कोणतीही माहिती ते शेअर करत नाहीत.
दाव्यानुसार, व्हॉट्सअॅप युजर्सची काही निवडक माहिती फेसबुकला देण्यात येईल. त्यानंतर फेसबुक आणि इन्स्टाग्राम वापरत असताना कंपनीला युजर्सना लक्ष्याधारीत जाहिरात दाखवणे सोपं होऊ शकते.
व्हॉट्सचा वापर करतो पण फेसबुकचा नाही, मग कोणती माहिती शेअर होणार?
या सुनावणी दरम्यान, वरिष्ठ वकील अरविंद दातार यांनी, मी सोशल मीडियाचा वापर करत नाही. मात्र, व्हॉट्सअॅपचा वापर करतो. तर, फेसबुकला माझ्याबाबत काय माहिती असणार? असा प्रश्न केला.
प्रायव्हसी हवी असेल तर व्हॉट्सअॅप युजरकडे फेसबुक खाते नसावे. युजर्सला जर व्हॉट्सअॅपचा वापर करणे सोडून देता येत नसेल तर त्याने किमान त्याचे फेसबुक अकाउंट बंद करावे असे कोर्टात सांगण्यात आले.
2016 मध्ये व्हॉट्सअॅप युजर्सचा डेटा फेसबुकला देण्याच्या धोरणाच्या विरोधात दोन विद्यार्थ्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली आहे. सोशल मीडिया अॅप्समधील हा करार युजर्सच्या प्रायव्हसीचा भंग असून अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरील हल्ला असल्याचा दावा याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांनी केला आहे.
फेसबुक या सोशल मीडिया अॅपचा सर्वाधिक डाऊनलोड होणाऱ्या अॅपमध्ये समावेश आहे. फेसबुकने मेसेजिंग अॅप व्हॉट्सअॅप खरेदी केले. त्यानंतर इन्स्टाग्राम हे अॅपदेखील खरेदी केले. त्यानंतर या कंपन्यांना मेटा या कंपनीच्या छत्राखाली एकत्र आणले.