(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Google चे सीईओ सुंदर पिचाईंनी दिला आठवणींना उजाळा; सांगितला वडिलांसोबतच्या पहिल्या ईमेलचा किस्सा
Google CEO : अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी त्यांचे वडील आणि मुलाशी संबंधित एक किस्सा शेअर केला आहे, ज्यामध्ये त्यांनी त्यांच्या पहिल्या ईमेलची गोष्ट सांगितली आहे.
Google CEO : गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनी नुकताच लिहिलेला एक ब्लॉग सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आपल्या या ब्लॉगमध्ये पिचाई यांनी त्यांच्या खासगी आयुष्यातील किस्से शेअर केले आहेत. ब्लॉगमध्ये सुंदर पिचाई यांनी त्यांच्या वडिलांबाबतचा एक 25 वर्षांपूर्वीचा किस्सा शेअर केला आहे. पिचाई यांनी सांगितलेला किस्सा ऐकून भावूक व्हायला होतंय. सध्या हा किस्सा सर्वांमध्येच चर्चेचा विषय ठरत आहे.
सप्टेंबर 2023 मध्ये गुगलला 25 वर्ष पूर्ण झाली आहेत. याचनिमित्तानं गुगलची पॅरेंट कंपनी अल्फाबेटचे सीईओ सुंदर पिचाई यांनी आपल्या काही जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. यासर्व आठवणी त्यांनी आपल्या एका ब्लॉगमध्ये एकत्र केल्या आहेत. ज्यामध्ये त्यांच्या वडिलांसोबत झालेल्या एका चर्चेचा त्यांनी उल्लेख केला आहे. सुंदर पिचाई यांनी आपल्या ब्लॉगमध्ये लिहिलंय की, गेल्या 25 वर्षांत टेक्नॉलॉजीनं आपल्या संवाद साधण्याच्या पद्धतीच बदलून टाकल्या आहेत. याचं उदाहरण देताना त्यांनी सांगितलं की, काही वर्षांपूर्वी जेव्हा ते अमेरिकेत शिक्षण घेत होते, त्यावेळी त्यांचे वडील भारतात राहायचे, तेव्हा त्यांच्याशी संवाज साधण्यासाठी सुंदर पिचाई यांच्याकडे सर्वात स्वस्त साधन होतं ते म्हणजे, ईमेल. ते ईमेलमार्फत वडिलांशी संवाद साधायचे, त्यांची ख्यालीखुशाली जाणून घ्यायचे. एकदा त्यांनी आपल्या वडिलांना ईमेल केला होता. पण त्या ईमेलला भारतातून त्यांच्या वडिलांनी दिलेलं उत्तर त्यांना दोन दिवसांनी मिळालं होतं. ज्यामध्ये त्यांच्या वडिलांनी लिहिलं होतं की, "डियर पिचाई, इमेल मिळाला... सर्वकाही ठिक आहे."
पिचाई यांनी पुन्हा केला फोन
ईमेल मिळण्यास उशीर झाल्यामुळे पिचाई यांनी वडिलांना फोनही केला होता. ज्यावर त्यांच्या वडिलांनी सांगितलं की, त्यांच्या कार्यालयातील कोणालातरी त्यांच्या पीसीवर ईमेल रिसिव्ह करावा लागेल. त्यानंतर त्याची प्रिंट आऊट काढून त्यांच्यापर्यंत पोहोचवावी लागते. त्यानंतर माझ्या वडिलांनी मला रिप्लाय देण्यासाठी एक मेसेज लिहिला आणि त्यानंतर तो टाईप करुन पाठवण्यात आला. त्याने मला फी पाठवण्यासाठी मला टाइप केले.
आता तंत्रज्ञान खूप प्रगत झालंय
सुंदर पिचाई म्हणाले की, आजच्या काळात तंत्रज्ञान खूप प्रगत झालं आहे. ते म्हणाले की, एकदा मी माझ्या मुलासोबत होतो. त्यानं काहीतरी पाहिलं आणि त्याचा मोबाईलमध्ये फोटो काढला. मग तो फोटो त्यानं त्याच्या मित्रांसोबत शेअर केला. त्यानंतर त्यांनी एकमेकांना मेसेज केले. खिशातून फोन काढण्यापेक्षाही हे सगळं मला वेगवान वाटत होतं. अनेक वर्षांपूर्वी माझ्या वडिलांशी ज्या प्रकारे संवाद साधला त्याच्या तुलनेत आज माझा मुलगा ज्या पद्धतीनं संवाद साधतो, त्यावरून पिढ्यानपिढ्या किती बदल होऊ शकतात, हे लक्षात येतं.