WTC Final 2021: न्यूझीलँडच्या तिसऱ्या दिवसअखेर 2 विकेट्सवर 101 धावा, कॉन्वेचं अर्धशतक
WTC Final 2021: न्यूझीलँडनं सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेच्या अर्धशतकाच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 101 धावा केल्या आहेत. न्यूझीलँडकडून टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी सावध सुरुवात करुन दिली.
![WTC Final 2021: न्यूझीलँडच्या तिसऱ्या दिवसअखेर 2 विकेट्सवर 101 धावा, कॉन्वेचं अर्धशतक WTC Final 2021: New Zealand first innings 101 runs 2 wicket against Team india Day 3 Southampton WTC Final 2021: न्यूझीलँडच्या तिसऱ्या दिवसअखेर 2 विकेट्सवर 101 धावा, कॉन्वेचं अर्धशतक](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2021/06/20/55b48e7973a660002ce65b290e720979_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
WTC Final 2021: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपचा अंतिम सामना इंग्लंडमध्ये सुरु आहे. पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे पाण्यात गेल्यानंतर भारताचा पहिला डाव 217 धावांवर संपुष्टात आला. यानंतर न्यूझीलँडनं सलामीवीर डेव्हॉन कॉन्वेच्या अर्धशतकाच्या जोरावर तिसऱ्या दिवसअखेर 2 बाद 101 धावा केल्या आहेत. न्यूझीलँडकडून टॉम लॅथम आणि डेव्हॉन कॉन्वे यांनी सावध सुरुवात करुन दिली. टॉम लॅथमला अश्विनने 30 धावांवर बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. लॅथम आणि कॉन्वेने पहिल्या गड्यासाठी 70 धावांची भागीदारी केली. त्यानंतर विल्यमसनच्या साथीनं डेव्हन कॉन्वेने आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दिवसाच्या शेवटच्या षटकात इशांत शर्माने कॉन्वेला 54 धावांवर बाद करत दुसरा धक्का दिला. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला त्यावेळी न्यूझीलँडने 2 बाद 101 धावा केल्या आहेत. न्यूझीलँड अद्याप 116 धावांची पिछाडीवर आहेत. सध्या विल्यमसन 12 तर रॉस टेलर शून्यावर खेळत आहेत.
जेमिसन वादळापुढं भारताचा डाव गडगडला
भारतीय संघानं 3 बाद 146 वरुन पुढे खेळायला सुरुवात केली. यात आज केवळ 71 धावांची भर टीम इंडियानं घातली. विराट कालच्याच 44 धावांवर बाद झाला. त्यानंतर आलेला ऋषभ पंत केवळ धावा काढून माघारी परतला. विराटनंतर अजिंक्य रहाणेचेही अर्धशतक हुकले. तो 49 धावांवर बाद झाला. त्यानंतर रविचंद्रन अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी टीम इंडियाला दोनशेपार पोहोचवले. चांगली सुरुवात करणारा अश्विन 22 धावांवर बाद झाला. उपाहारानंतर जेमिसनने इशांत शर्माला (4) त्यानंतर जसप्रीत बुमराहला (0) लागोपाठ बाद केलं. शेवटी ट्रेंट बोल्टने रवींद्र जाडेजाला (15) धावांवर बाद करत भारताचा डाव 217 धावांवर संपुष्टात आणला. न्यूझीलँडचा वेगवान गोलंदाज कायले जेमीसनने पाच विकेट घेतल्या. तर बोल्ट आणि वॅगनरनं प्रत्येकी 2 विकेट घेतल्या.
कसोटी विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस 'पाण्यात'!
साऊदम्पटनमधील हॅम्पशायर बाऊलच्या मैदानात हा सामना खेळवला जात आहे. मात्र पहिल्या दिवशी साऊदम्पटनमध्ये पाऊस झाल्यानं क्रीडा प्रेमींची निराशा झाली. पावसाच्या बॅटिंगमुळे पहिल्या दिवसाचा खेळ पूर्णपणे वाया गेला. पावसामुळे आणि आऊट फिल्डवर पावसाचे पाणी असल्याने सामना खेळला गेलाच नाही.पंचांनी मैदानाची पाहणी केल्यानंतर सामना सुरू करणे शक्य होणार नसल्याचे सांगितलं. त्यामुळे पहिल्या दिवसाचा खेळ रद्द करण्यात आला होता.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)