SA vs AUS, WT20 Final : भारतानंतर इंग्लंडचं आव्हान संपलं, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकामध्ये रंगणार फायनल
ENG vs SA, WT20 Semi-Final : आयसीसी महिला टी 20 विश्वचषकात दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामनाही रोमांचक झाला
England Women vs South Africa Women : आयसीसी महिला टी 20 विश्वचषकात दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामनाही रोमांचक झाला. यजमान दक्षिण आफ्रिाक संघाने इंग्लंडचा सहा धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे. आता 26 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये फायनलचा थरार रंगणार आहे. दक्षिण आफ्रिका संघाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात चार विकेट्सच्या मोबदल्यात 164 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरदाखल धावांचा पाठलाग करताना इंग्लंडचा संघ 20 षटकात 158 धावांपर्यंत मजल मारु शकला. दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज अयाबोंगा खाका हिने भेदक मारा करत इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवला.
धावांचा पाठलाग करणारा इंग्लंडचा संघ विजयाच्या उंबरठ्यावर होता. पण 18 व्या षटकात सामना फिरला. या षटकात अयाबोंगा खाका हिने इंग्लंडच्या तीन फलंदाजांना बाद करत बाजी पलटवली. या विजयासह दक्षिण आफ्रिका संघाने फायनलमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचा सामना ऑस्ट्रेलियासोबत होणार आहे. ऑस्ट्रेलियाने भारताचा पाच धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला आहे.
दक्षिण आफ्रिका महिला संघाची कर्णधार सूने लुसने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. लौरा वोलवार्ड आणि ताजमीन ब्रिट्स यांनी दक्षिण आफ्रिकेला आक्रमक सुरुवात करुन दिली. दोघींनी सहा षटकात 37 धावांची भागिदारी केली होती. या दोघांनी इंग्लंडच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. पहिल्या विकेटसाठी त्यांनी 96 धावांची भागिदारी केली. वोलवार्ड हिने 44 चेंडूत 53 धावांची खेळी केली. जोडीदार बाद झाल्यानंतर ताजमीन ब्रिट्सने मरिजाने कप्प हिच्या जोडीने धावांची गती वाढवली. दुसऱ्या विकेटसाठी 25 चेंडूत 46 धावांची भागिदारी केली. ब्रिट्सने 55 चेंडूत 68 धावांची विस्फोटक खेळे केली. अखेरच्या षटकात मरिजाने कप्पा हिने फटकेबाजी करत धावसंख्या वाढवली. दक्षिण आफ्रिकेने 20 षटकात 4 विकेट्सच्या मोबद्लयात 164 धावा केल्या. इंग्लंडकडून सोफी एक्लेस्टोनने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या.
165 धावांचा पाठलाग करणाऱ्या इंग्लंड संघाला सोफी डंकली आणि डेनियल वॅट यांनी दमदार सुरुवात करुन दिली. या जोडीने 53 धावांची भागिदारी केली. एलाइस कॅप्सीला एकही धाव काढता आली नाही. डेनियलने नताली सिवर ब्रंटसोबत डाव सांभाळण्याचा प्रयत्न केला. पण एकापाठोपाठ एक ठरावीक अंतराने विकेट्स पडल्या. डेनियल आणि नतालीने सामना जिंकण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले. पण अयाबोंगा खाका हिने मोक्याच्या क्षणी एकाच षटकात तीन विकेट घेत सामना फिरवला.
आणखी वाचा :
कांगारुंना घरचा आहेर, ऑस्ट्रेलियाच्या माजी खेळाडूने पॅट कमिन्सला सुनावलं, म्हणाला....
कांगारुंचं नेमकं चाललंय तरी काय! कमिन्स, वॉर्नरनंतर आता आणखी एक खेळाडू ऑस्ट्रेलियाला गेला