KING Is Back : भारताच्या विजयानंतर आयसीसीनं विराटचा खास फोटो केला पोस्ट
T20 World Cup 2022 : परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत टीम इंडियानं भारतीयांना दिवाळीची विजयी भेट दिली.
T20 World Cup 2022 : परंपरागत प्रतिस्पर्धी पाकिस्तानचा पराभव करत टीम इंडियानं भारतीयांना दिवाळीची विजयी भेट दिली. या सामन्यात विराट कोहली, हार्दिक पांड्या आणि अर्शदीप सिंह यांनी चमकदार कामगिरी केली. भारताच्या विजयात विराट कोहलीनं मोलाची भूमिका बजावली. विराट कोहलीनं नाबाद 82 धावांची खेळी करत भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. 50 धावांच्या आत भारताचे आघाडीचे चार फलंदाज तंबूत परतले होते. भारतीय संघाची अवस्था दयणीय झाली होती. पाकिस्तानच्या गोलंदाजांनी भारताच्या तगड्या फलंदाजीचं कंबरडं मोडलं होतं. अशातच विराट कोहलीनं कणा बनत हार्दिक पांड्याला साथीला घेत विजय मिळवून दिला. विराट कोहलीनं सुरुवातीला संयमी फलंदाजी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. त्यानंतर अखेरच्या षटकात फटकेबाजी करत भारताला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. विराट कोहलीच्या या जिगरबाज खेळीनंतर सोशल मीडियावर कौतुकांचा वर्षाव होतोय. कलाकार, सेलेब्रिटी, राजकीय नेते, आजी-माजी क्रिकेटपटू यांच्यासह सर्वच क्रीडा चाहत्यांकडून विराट कोहलीचं कौतुक होत आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीनं विराट कोहलीसाठी खास ट्वीट केलेय. आयसीसीनं विराट कोहलीचा पोस्ट केलेला फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
आयसीसीनं विराट कोहलीचा सिंहासनावर बसलेला फोटो पोस्ट केला आहे. या फोटोसोबत आयसीसीनं 'विराट कोहली इज बॅक' असं म्हटलेय. त्याशिवाय विराट कोहलीला पुढील सामन्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. आयसीसीनं ट्वीट केलेला फोटो सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
पाहा आयसीसीचं ट्वीट -
The KING is back 👑
— ICC (@ICC) October 23, 2022
Take a bow, Virat Kohli 🙌#T20WorldCup | #INDvPAK pic.twitter.com/OdAnbmso0h
विराट कोहलीनं 53 चेंडूत 82 धावांची जबरदस्त खेळी केली. 154.71 च्या स्ट्राईक रेटनं विराट कोहलीनं फलंदाजी केली. या खेळीदरम्यान विराट कोहलीनं चार षटकार आणि सहा चौकार लगावले. विराट कोहलीनं हार्दिक पांड्यासोबत भारताचा डाव सावरला. हार्दिक पांड्यासोबत विराट कोहलीनं शतकी भागिदारी केली. विराट कोहली (Virat Kohli) आणि हार्दिक पांड्या (Hardik Pandya) यांनी 113 धावांची विक्रमी भागिदारी केली. ज्यामुळे भारताचा विजय सोपा झाला. सलामीवीर केएल राहुल आणि रोहित शर्मा प्रत्येकी 4 धावा करुन तंबूत परतले. त्यानंतर सूर्यकुमारही 15 धावा करुन बाद झाला. मग अक्षर 2 धावांवर धावचीत झाला आणि 50 धावांच्या आतच भारताचे 4 गडी तंबूत परतले. त्यानंतर हार्दिक आणि विराट कोहली यांनी शतकी भागिदारी केली.