आयर्लंडनं इंग्लंडला नमवलं, नेदरलँड्समुळं द. आफ्रिका स्पर्धेतून बाहेर; यंदाच्या टी-20 विश्वचषकातील अनपेक्षित निकाल
T20 World Cup 2022: आस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेतील सेमीफायनलचं चित्र स्पष्ट झालंय. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे चार संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत.
T20 World Cup 2022: आस्ट्रेलियात सुरु असलेल्या टी-20 विश्वचषक 2022 स्पर्धेतील सेमीफायनलचं चित्र स्पष्ट झालंय. भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड आणि इंग्लंड हे चार संघ सेमीफायनलसाठी पात्र ठरले आहेत. सेमीफायनलचा पहिला सामना (9 नोव्हेंबर) न्यूझीलंड आणि पाकिस्तान यांच्यात पार पडणार आहे. तर, भारत आणि इंग्लंड यांच्यात दुसरा सेमीफायनल सामना (10 नोव्हेंबर) खेळला जाणार आहे. यंदाची टी-20 विश्वचषक स्पर्धा अनेक अर्थांनी लक्षवेधी ठरली. या स्पर्धेतील अनपेक्षित निकालांमुळं ही स्पर्धा नेहमीच क्रिकेटप्रेमींच्या लक्षात राहील. या स्पर्धेतील एकूण सहा सामन्यात अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. यातील तीन सामने पात्रता फेरीतील आहेत. तर, उर्वरित तीन सामने सुपर 12 फेरीतील आहेत.
टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील उलटफेर
आयर्लंडकडून बलाढ्य इंग्लंडचा पराभव
टी-20 विश्वचषकाच्या 20व्या सामन्यात इंग्लंड आणि आयर्लंडचा संघ एकमेकांशी भिडले होते. या सुपर 12 फेरीतील सामन्यात आयर्लंडनं डकवर्थ लुईच्या नियमांतर्गत इंग्लंडचा पाच धावांनी पराभव केला होता. यापूर्वी 2011 च्या विश्वचषकात आयर्लंडनं इंग्लंडचा पराभव केला होता.
झिम्बाब्वेनंविरुद्ध पाकिस्तानचा अवघ्या एका धावेनं पराभव
पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यात 27 ऑक्टोबर 2022 रोजी पर्थ येथे सुपर 12 फेरीतील सामना खेळला गेला. या सामन्यात झिम्ब्बाब्वे दिलेल्या 131 धावांचा पाठलाग करताना पाकिस्तानच्या संघाला अवघ्या एका धावेनं पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानविरुद्ध मिळवलेला विजय हा झिम्बाब्वेसाठी सर्वोत्तम मानला जाईल. हा सामना पाकिस्तानचा संघ एकतर्फी जिंकेल असं वाटत असताना झिब्बाब्वेच्या संघानं पाकिस्तानला हरवून संपूर्ण क्रिडाविश्वाचं लक्ष वेधून घेतलं.
नेदरलँड्सनं दक्षिण आफ्रिकेला स्पर्धेबाहेर काढलं
यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमधील सर्वात अनपेक्षित निकाल म्हणजे चांगल्या फॉर्ममध्ये असलेल्या दक्षिण आफ्रिकेचा नेदरलँड्सविरुद्ध सामन्यात पराभव. दरम्यान, सुपर 12 फेरीतील आपल्या अखेरच्या आणि महत्वाच्या सामन्यात नेदरलँड्सच्या संघानं दक्षिण आफ्रिकेला 13 धावांनी पराभूत केलं. या पराभवासह दक्षिण आफ्रिकेचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलं. तसेच पाकिस्तानसाठी सेमीफायनलचे दरवाजे उघडले. पाकिस्तानच्या संघानंही त्यांना मिळालेल्या संधीचं सोन केलं. बांगलादेशला नमवून पाकिस्तानच्या संघानं सेमीफायनलमध्ये धडक दिली.
पात्रता फेरीतील अनपेक्षित निकाल
टी-20 विश्वचषकाच्या सुपर 12 फेरीतील सामन्यांपूर्वी पात्रता फेरीतील सामने पार पडले. ज्यात श्रीलंका, नेदरलँड्स, नामिबिया, यूएई, झिम्बाब्वे, आयर्लंड, स्कॉटलँड आणि वेस्ट इंडीजच्या संघाला आपली गुणवत्ता सिद्ध करून सुपर 12 फेरीचं तिकिट मिळवायचं होतं. मात्र, पात्रता फेरीतही तीन अनपेक्षित निकाल पाहायला मिळाले. यातील सर्वात मोठा उलटफेर म्हणजे स्कॉटलँडच्या संघानं निर्णायक सामन्यात वेस्ट इंडीजचा पराभव करून त्यांन पात्रता फेरीतच सामना गुंडळायला लावलं.
हे देखील वाचा-