T20 World Cup 2022 : आयपीएलमधील धमाकेदार प्रदर्शनाच्या जोरावर 'या' त्रिकुटानं मिळवली विश्वचषकाच्या संघात जागा, आता वर्ल्डकप जिंकवण्यासाठी सज्ज
T20 World Cup 2022 : भारतीय संघ ऑक्टोबरच्या सुरुवातीला आगामी टी20 विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. विराट-सूर्यकुमारसह बरेच असे दिग्गज संघात आहेत, जे एकट्याच्या जीवावर सामना जिंकवून देऊ शकतात.
ICC T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून आगामी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) सुरु होणार आहे. यासाठी बीसीसीआयनं काही दिवसांपूर्वी भारतीय संघ जाहीर केला. संघामध्ये सध्या फॉर्मात असलेले खेळाडू सामिल असून काहींनी अगदी आश्चर्यकारकरित्या संघात जागा मिळवली आहे. भारतीय संघात विराट-सूर्यकुमारसह बरेच असे दिग्गज संघात आहेत, जे एकट्याच्या जीवावर सामना जिंकवून देऊ शकतात. यातील काही दिग्गज आयपीएल 2022 (IPL 2022) स्पर्धेतून पुन्हा फॉर्ममध्ये आले आहेत. यातील महत्त्वाचे तीन खेळाडू म्हणजे यष्टीरक्षक फलंदाज दिनेश कार्तिक (Dinesh Karthik), अर्शदीप सिंह (Arshdeep Singh) आणि दीपक हुडा (Deepak Hooda).
आयपीएल 2022 स्पर्धेपूर्वी महालिलाव पार पडला. या लिलावानंतर बऱ्याच खेळाडूंचे संघ बदलले त्यात आयपीएल 2022 मध्ये गुजरात आणि लखनौ हे दोन नवे संघही सामिल झाले. या सर्वबदलानंतर काही खेळाडूंचा खेळ कमालीचा सुधारला यामध्ये दिनेश कार्तिक केकेआरमधून आरसीबीमध्ये गेला आणि तिथला स्टार फिनिशर बनला. युवा अर्शदीप पंजाबचा शमीसोबत मुख्य गोलंदाज बनला. तर दीपक हुडानेही लखनौ संघाकडून कमालीची खेळी दाखवली. तर या तिघांसाठी आयपीएल 2022 कशी होती, हे थोडक्यात पाहू...
दिनेश कार्तिक
आयपीएल 2022 मध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळलेल्या दिनेश कार्तिकने आपल्या खेळाने सर्वांनाच प्रभावित केलं. यष्टीरक्षक फलंदाज असणाऱ्या दिनेशने बऱ्याच महत्त्वाच्या सामन्यात संघासाठी फिनिशरची भूमिका बजावली. आयपीएल 2022 मध्ये दिनेश कार्तिकच्या आकडेवारीवर नजर टाकली तर त्याने 16 सामन्यांमध्ये 183.33 च्या स्ट्राईक रेटने 330 धावा केल्या. यादरम्यान दिनेश कार्तिकची सरासरी 55 होती तर सर्वोत्तम धावसंख्या नाबाद 66 होती. त्याने 27 चौकार आणि 22 षटकारही ठोकले. IPL 2022 मधील याच कामगिरीच्या जोरावर दिनेश कार्तिकचा भारतीय संघात समावेश करण्यात आला.
दीपक हुडा
दीपक हुडा हा देखील आयपीएल 2022 मध्ये चमकलेला एक खेळाडू आहे. त्याने लखनौचा कर्णधार केएल राहुलच्या नेतृत्वाखालील उत्तम कामगिरी केली. दीपकने आयपीएलमध्ये शानदार फलंदाजी केली. IPL 2022 मधील दीपक हुडाची कामगिरी पाहता, त्याने 15 सामन्यात 451 धावा केल्या. यादरम्यान हुडाची सरासरी 32.21 होती, तर स्ट्राईक रेट 136.6 होता. त्याने 36 चौकार आणि 18 षटकारही मारले.
अर्शदीप सिंह
डावखुरा युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने आयपीएल 2022 मध्ये पंजाब किंग्जसाठी आपल्या गोलंदाजीने कमाल केली. त्याने 2022 हंगामात 38.50 च्या सरासरीने 10 विकेट्स घेतल्या. त्याचा इकॉनॉमी रेट 7.70 होता. त्यानंतर अर्शदीपने आशिया कप 2022 मध्ये देखील चमकदार कामगिरी केली. विशेषत: डेथ ओव्हर्समध्ये गोलंदाजी करण्याच्या त्याच्या क्षमतेवर त्याने विश्वचषक संघात जागा मिळवली आहे.
हे देखील वाचा-