(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs AUS: कार्तिकऐवजी ऋषभ येणार होता; रोहितनं शेवटच्या क्षणी बदलला निर्णय, सामन्यानंतर खुलासा
IND vs AUS 2nd T20: नागपूर (Nagpur) येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनं पराभव केलाय.
IND vs AUS 2nd T20: नागपूर (Nagpur) येथे खेळण्यात आलेल्या दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा सहा विकेट्सनं पराभव केलाय. पावसामुळं हा सामना 8-8 षटकांचा खेळण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करत ऑस्ट्रेलयानं भारतासमोर 90 धावांचं लक्ष्य ठेवलं. प्रत्युत्तरात भारतानं चार चेंडू राखून ऑस्ट्रेलियाचा पराभव केला. भारताच्या विजयानंतर दिनेश कार्तिकची (Dinesh Karthik) खूप चर्चा होत आहे. अखेरच्या क्षणी आलेल्या कार्तिकनं अवघ्या 2 चेंडूत 10 धावांची तुफानी खेळी करत भारताच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. महत्वाचं म्हणजे, कार्तिकपूर्वी संघ ऋषभ पंतला फलंदाजीसाठी पाठवण्याच्या विचारात होता. परंतु, अखेरच्या क्षणी रोहित शर्मानं निर्णय बदलला आणि कार्तिकला फलंदाजीसाठी बोलावलं. याचा खुलासा खुद्द कर्णधार रोहित शर्मानेच सामन्यानंतर केलाय.
रोहित शर्मा काय म्हणाला?
ऑस्ट्रेलियाविरुद्ध विजयानंतर रोहित शर्मा म्हणाला की, "आम्ही ऋषभ पंतला पाठवता येईल का याचा विचार करत होतो, पण मला वाटले की सॅम्स शेवटचे ओव्हर टाकेल आणि तो फक्त ऑफ कटर टाकेल, म्हणून मला वाटलं की डीकेला येऊ द्या. असाही दिनेश कार्तिक संघासाठी फिनिशरची भूमिका बजावत आहे."
कार्तिकचा फिनिशिंग टच
दरम्यान, 8 षटकात 91 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कार्तिकला फलंदाजीची संधी मिळाली, जेव्हा हार्दिक पंड्या 7 व्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर बाद झाला. रोहित शर्मानं 7व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर चौकार मारून सामना भारताच्या बाजूनं झुकवला. यानंतर फिनिशिंग टच देत दिनेश कार्तिकनं डॅनियल सॅम्सच्या शेवटच्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर स्क्वेअर लेगच्या दिशेने षटकार ठोकला. त्यानंतर भारताला पाच चेंडूत तीन धावांची गरज असताना त्यानं चौकार मारत भारताला विजय मिळवून दिला.
भारताची मालिकेत 1-1 अशी बरोबरी
तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळण्यासाठी भारतात आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या संघानं मोहाली येथे खेळण्यात आलेल्या पहिल्या टी-20 सामन्यात भारताचा पराभव केला. त्यानंतर नागपूर टी-20 सामन्यात भारतानं ऑस्ट्रेलियाचा पराभव करत मालिकेतील आव्हान जिवंत ठेवलं आहे. यानंतर हैदराबादच्या गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर या मालिकेतील अखेरचा आणि निर्णायक सामना खेळला जाणार आहे. या सामन्यात विजय मिळवणार संघ मालिकेवर नाव कोरेल.
हे देखील वाचा-