एक्स्प्लोर
'महाराष्ट्र केसरी'ची गदा पुन्हा अभिजीत कटके पटकावणार?
पुण्याच्या शिवरामदादा तालमीचा पठ्ठ्या आणि पैलवान चंद्रकांत उर्फ तात्या कटके यांचा लेक अशी ओळख असलेला अभिजीत यंदाच्या मोसमात जबरदस्त फॉर्मात आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी जिंकून तो तिथंच थांबला नाही. अभिजीतने यंदा ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीच्या सुवर्णपदकावर आणि सीनियर राष्ट्रीय कुस्तीच्या रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं
मुंबई : अभिजीत कटके 'महाराष्ट्र केसरी'चा मानाचा किताब पुन्हा जिंकणार की, यंदा आपल्याला नवा 'महाराष्ट्र केसरी' पाहायला मिळणार, हाच सवाल सध्या महाराष्ट्रातल्या कुस्तीशौकिनांच्या मनात आहे. महाराष्ट्राच्या कुस्तीत सर्वात प्रतिष्ठेच्या असलेल्या 'महाराष्ट्र केसरी' कुस्तीला आजपासून जालन्याच्या आझाद मैदानावर सुरुवात होत आहे.
अभिजीत कटकेने गेल्या वर्षी किरण भगतला हरवून भूगावात महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली होती. अभिजीतची गेल्या वर्षभरातली कामगिरी लक्षात घेता, त्यालाच यंदा सलग दुसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी जिंकण्याची पसंती देण्यात येत आहे.
अभिजीत कटकेने साताऱ्याच्या किरण भगतचं आव्हान मोडून काढलं आणि महाराष्ट्र केसरी किताब जिंकला, त्याला आता वर्ष होत आलं आहे. महाराष्ट्र केसरीचा अश्वमेध मुळशीतल्या भूगावातनं मराठवाड्यातल्या जालन्यात दाखल झाला आहे. आता सवाल आहे, अभिजीत कटके जालन्याच्या अधिवेशनात महाराष्ट्र केसरीचा किताब पुन्हा जिंकणार का?
पुण्याच्या शिवरामदादा तालमीचा पठ्ठ्या आणि पैलवान चंद्रकांत उर्फ तात्या कटके यांचा लेक अशी ओळख असलेला अभिजीत यंदाच्या मोसमात जबरदस्त फॉर्मात आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्र केसरी जिंकून तो तिथंच थांबला नाही. अभिजीतने यंदा ज्युनियर राष्ट्रीय कुस्तीच्या सुवर्णपदकावर आणि सीनियर राष्ट्रीय कुस्तीच्या रौप्यपदकावर आपलं नाव कोरलं. या कामगिरीने त्याचा आत्मविश्वास दुणावला. आंतरराष्ट्रीय आव्हानाला सामोरं जाण्याआधी, अधिकाधिक पैलवानांशी खेळण्याचा अनुभव गाठीशी असावा म्हणून अभिजीत कटके महाराष्ट्र केसरीच्या मैदानात दाखल झाला आहे.
कशी असते 'महाराष्ट्र केसरी'ची गदा?
अभिजीत कटकेच्या तोलामोलाचा पैलवान आणि गतवेळच्या उपविजेत्या किरण भगतने पाठदुखी आणि कंबरदुखीच्या कारणास्तव महाराष्ट्र केसरीतून माघार घेतली आहे. पण किरण भगतच्या अनुपस्थितीत महाराष्ट्र केसरी जिंकण्याचं आव्हान सोपं झालं, असं मानायची अभिजीतची तयारी नाही.
महाराष्ट्र केसरी किताबाची कुस्ती ही माती आणि मॅट विभागांमधल्या विजेत्या पैलवानांमध्ये खेळवण्यात येत असते. किरण भगतला आजही मातीवरच्या कुस्तीत तोड नाही. पण त्याच्या अनुपस्थितीत मातीतून एखाद्या नव्या पैलवानाला किताबाच्या फायनलमध्ये धडक मारण्याची संधी आहे. सोलापूरचा माऊली जमदाडे, बीडचा गोकुळ आवारे, जालन्याचा विलास डोईफोडे, पुणे शहरचा साईनाथ रानवडे, पुणे जिल्ह्याचा मुन्ना झुंझुरके आणि परभणीचा बाला रफिक शेख यांच्या मातीतल्या कामगिरीकडे कुस्तीतल्या जाणकारांची नजर राहील. अभिजीत कटकेचा समावेश असलेल्या मॅट विभागात पुण्याचा शिवराज राक्षे, बीडचा अक्षय शिंदे, कोल्हापूरचा कौतुक डाफळे, नाशिकचा हर्षद सदगीर, नगरचा विष्णू खोसे ही पैलवान मंडळीही यंदा चांगलीच तयारीत आहेत. अभिजीत कटकेला किताबाच्या फायनलमध्ये धडक मारण्याआधी कडव्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे. त्यामुळे यंदाच्या महाराष्ट्र केसरीच्या निमित्ताने मराठवाड्यातल्या क्रीडारसिकांना तुफानी कुस्त्या पाहण्याची संधी मिळणार आहे. महाराष्ट्र केसरीच्या 62 व्या अधिवेशनाच्या निमित्ताने जालन्यात तब्बल 49 वर्षांनी पुन्हा प्रतिष्ठेचा किताबाचा मानकरी कोण, याचा फैसला होणार आहे. याआधी 1969 साली हरिश्चंद्र बिराजदारांनी महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरलं होतं. बिराजदार मामांकडून प्रेरणा घेऊन, त्यांच्या मराठवाड्याचा एखादा पैलवान महाराष्ट्र केसरीत बाजी मारणार की, अभिजीत कटके पुन्हा महाराष्ट्र केसरी किताबावर आपलं नाव कोरणार, याचा फैसला येत्या रविवारी होईल.अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement