US Open Final : ज्योकोविचचं मोसमातलं चौथं ग्रँड स्लॅम हुकलं; रशियाच्या डॅनियल मेद्वेदेवला अमेरिकन ओपनचं विजेतेपद
US Open Final : अमेरिकन ओपनच्या रंगतदार अंतिम सामन्यात डॅनियल मेद्वेदेवनं सर्बियाच्या नोवाक ज्योकोविचचा पराभव करत अमेरिकन ओपनचा किताब आपल्या नावे केला.
US Open Final : सर्बियाच्या नोवाक ज्योकोविचनं अमेरिकन ओपनच्या फायनलमध्ये हार स्वीकारली आणि एकाच मोसमात चारही ग्रॅंड स्लॅम जिंकून कॅलेंडर ग्रॅंड स्लॅमचा इतिहास घडवण्याची त्याची संधी हुकली. रशियाच्या डॅनियल मेद्वेदेवनं ज्योकोविचचं आव्हान 6-4, 6-4, 6-4 असं मोडून काढलं आणि अमेरिकन ओपनच्या विजेतेपदावर आपलं नाव कोरलं.
अमेरिकन ओपनचा अंतिम सामना (US Open Final) रविवारी रात्री उशीरा न्यूयॉर्कमध्ये खेळवण्यात आला. अंतिम सामन्यात सर्बियाच्या नोवाक ज्योकोविच (Novak Djokovic) आणि रशियाचा डॅनियल मेद्वेदेव (Daniil Medvedev) यांच्यात खेळवण्यात आला होता.
अमेरिकन ओपनच्या रंगतदार सामन्यात डॅनियल मेद्वेदेव सुरुवातीपासूनच सामन्यात आपला दबदबा ठेवण्यात यशस्वी ठरला. सामना सुरु होण्यापूर्वी नोवाक ज्योकोविचला यूएस ओपन किताबाचा प्रबळ दावेदार मानलं जात होतं. पण मेद्वेदेवनं सुरुवातीपासूनच सामन्यात आघाडी घेतली होती. त्यामुळे नोवाक ज्योकोविच काहीसा दबावाखआली खेळताना दिसून आला. डॅनियल मेद्वेदेवनं ज्योकोविचचं आव्हान 6-4, 6-4, 6-4 असं मोडून काढलं. जवळपास सुमारे अडीच तास चाललेल्या या सामन्यात नोवाक ज्योकोविच प्रत्येक सेटमध्ये पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालं.
दरम्यान, ज्योकोविचनं यंदाच्या मोसमात ऑस्ट्रेलियन ओपन, फ्रेन्च ओपन आणि विम्बल्डन या तीन ग्रॅंड स्लॅमची विजेतीपदं पटकावली होती. ज्योकोविचनं अमेरिकन ओपनही जिंकली असती तर एकाच मोसमात चारही ग्रॅंड स्लॅम जिंकून कॅलेंडर ग्रॅंड स्लॅमचा इतिहास घडवण्याचा मान त्याला मिळाला असता. 1969 साली रॉड लेव्हर यांनी चारही ग्रॅंड स्लॅम जिंकून कॅलेंडर ग्रॅंड स्लॅमचा मान मिळवला होता. त्यानंतर एकाही पुरुष टेनिसपटूला तो पराक्रम घडवता आलेला नाही.
तुम्ही जगातील महान खेळाडू आहात : डॅनियल मेद्वेदेव
अमेरिकन ओपनच्या जेतेपदावर नाव कोरल्यानंतर डॅनियल मेद्वेदेवनं म्हटलं की, "सर्वात आधी तर मी तुमची आणि तुमच्या चाहत्यांची माफी मागतो. आपण सर्वच जाणतो की, आज काय झालं. तुम्ही यावर्षी आणि आपल्या कारकिर्दीत काय मिळवलंय. मी यापूर्वी कधीच असं म्हटलेलं नाही. माझ्यासाठी, तुम्ही इतिहासातील सर्वात महान टेनस खेळाडू आहात."
...अन् ज्योकोविचचे डोळे पाणावले
सामन्याच्या सुरुवातीपासूनच नोवाक ज्योकोविच पिछाडीवर असल्याचं पाहायला मिळालं. किताब गमावल्यानंतर नोवाक ज्योकोविचचे डोळे पाणावल्याचे पाहायला मिळाले. डॅनियल मेद्वेदेवच्या ऐतिहासिक विजयासाठी तो आनंद व्यक्त करत होता. पण दुसरीकडे चाहते नोवाकला समर्थन देत होते. सामन्यानंतर जोकोविच चाहत्यांना म्हणाला की, "मी सर्वात नशीबवान व्यक्ती आहे. कारण तुम्ही सर्वांनी मला कोर्टवर मला मी खूप खास असल्याचं जाणवून दिलं. यापूर्वी न्यूयॉर्कमध्ये मला असं कधीच वाटलं नव्हतं."
महत्त्वाच्या इतर बातम्या :
US Open 2021: ब्रिटनच्या एम्मा रादुकानूनं रचला इतिहास; वयाच्या 18व्या वर्षी जिंकला यूएस ओपनचा किताब