(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकून भारताने इतिहास रचला, भारत आणि रशिया संयुक्त विजेता
ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये भारताने पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरलं. भारत आणि रशियाला संयुक्त विजेता म्हणून घोषित करण्यात आलं. नाशिकच्या विदित गुजराथी या युवा बुद्धिबळपटूने भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं. विजयानंतर त्याच्या घरी जल्लोष करण्यात आला.
नाशिक : भारताने जागतिक ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत रविवारी (30 ऑगस्ट) इतिहास रचला. ऑनलाईन पार पडलेल्या या स्पर्धेत भारताने पहिल्यांदाच विजेतेपदावर नाव कोरलं आहे. मात्र भारत आणि रशियाला संयुक्त विजेता म्हणून घोषित करण्यात आलं. रशियाविरुद्ध खेळवण्यात आलेला अंतिम सामना इंटरनेट कनेक्शनमध्ये तांत्रिक अडचणी आल्यामुळे पूर्ण होऊ शकला नाही. परिणामी भारत आणि रशियाला संयुक्तरित्या विजेता घोषित करण्यात आलं. विशेष म्हणजे नाशिकच्या विदित गुजराथी या युवा बुद्धिबळपटूने भारतीय संघाचं नेतृत्त्व केलं.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फिडे (FIDE) अर्थात आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ महासंघाने पहिल्यांदाच ऑनलाईन पद्धतीने हे सामने आयोजत केले. यावेळी भारतीय संघात कर्णधार विदित गुजराथी, माजी चॅम्पियन विश्वनाथन आनंद, कोनेरु हम्पी, डी हरिका, आर प्राग्गनानंद, पी हरिकृष्णा, निहाल सरीन आणिर दिव्या देशमुख यांनी अंतिम सामन्यात रशियाविरुद्ध भारताचं प्रतिनिधित्त्व केलं.
रशियाला विजेता घोषित केल्याने भारताचा आक्षेप सुरुवातीला रशियाला विजेता म्हणून घोषित करण्यात आलं होतं. कारण अंतिम सामन्यात भारताच्या निहाल सरीन आणि दिव्या देशमुख हे इंटरनेट कनेक्शनमधील तांत्रिक अडचणींमुळे सर्व्हरसोबत कनेक्ट झाले नाही, परिणामी त्यांचा वेळ वाया गेला. भारताने या वादग्रस्त निर्णयाचा विरोध केला. यानंतर पडताळणी करण्यात आली.
फिडेचे अध्यक्ष काय म्हणाले? फिडेचे अध्यक्ष आर्काडी डोरोवकोविच म्हणाले की, जागतिक स्तरावर इंटरनेटमध्ये अडचणी असल्यामुळे भारतासह अनेक देशांमध्ये त्याचा परिणाम दिसत आहे. भारताचे दोन खेळाडूंना याचा फटका बसला आणि त्यांचं कनेक्शन गेलं. त्यामुळे सामन्याचा निकाल आला नाही. या प्रकरणात चेस डॉट कॉमने दिलेले पुरावे आणि अन्य सूत्रांकडून मिळालेल्या माहितीची तपासणी करण्यात आली. अखेर फिडेचा अध्यक्ष म्हणून मी दोन्ही संघांना सुवर्ण पदक देण्याचा निर्णय घेतला.
नाशिकमध्ये विदितच्या घरी जल्लोष
जागतिक ऑलिम्पियाड बुद्धिबळ स्पर्धेत संयुक्तपणे का होईना भारताला पहिल्यांदाच विजेतेपद मिळाल्याने भारतीय संघावर सर्वच स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. विशेष आणि अभिमानास्पद बाब म्हणजे नाशिकचा युवा बुद्धिबळपटू विदित गुजराथी हा भारताचा कर्णधार असल्याने त्याने भारतासह नाशिकचे नाव सातासमुद्रापार जाऊन पोहोचवले. विदितसह संपूर्ण भारतीय संघाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह क्रीडाक्षेत्रातील अनेक दिग्गजांनी ट्विटरद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत. कमी वयात विदितचे हे यश बघून त्याचे आई वडील आणि बहिण भारावून गेले. केक कापत विदितच्या घरी रविवारी रात्री विजयाचा जल्लोष साजरा करण्यात आला. योगायोग म्हणजे त्याच्या वडिलांचा रविवारी वाढदिवस असल्याने त्याने त्यांना एक मोठं गिफ्ट मिळालं.
विजयाचे सर्व श्रेय त्याने आपल्या संघाला देऊन सर्वांचे आभार मानले. विजयानंतर विदितने ट्वीट करुन लिहिलं आहे की, "बुद्धिबळ ऑलिम्पियाडचे आम्ही चॅम्पियन आहोत. सुपर हॅप्पी. रशियाचेही अभिनंदन.
We are the Champions!! 🇮🇳🥇Super happy! Congrats to Russia as well! #ChessOlympiad
— Vidit Gujrathi (@viditchess) August 30, 2020
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पंतप्रधान मोदी, राहुल गांधी यांच्याकडून शुभेच्छा फिडे ऑनलाईन बुद्धिबळ ऑलिम्पियाडचं संयुक्तरित्या विजेतेपद मिळवणाऱ्या भारतीय संघाला मनापासून शुभेच्छा. विदित गुजराथी आणि दिव्या देशमुळे महाराष्ट्राला तुमचा अभिमान आहे.
Hearty congratulations to Team India for winning FIDE Online Chess Olympiad jointly with Russia. Kudos to @viditchess and @DivyaDeshmukh05, Maharashtra is proud of you!
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 30, 2020
भारताच्या या विजयावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय संघाला शुभेच्छा देताना म्हटलं की, बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकणाऱ्या सर्व खेळाडूंचं अभिनंदन. त्यांचे अथक परिश्रम आणि समर्पण उल्लेखनीय आहे. त्यांचं यश निश्चितपणे इतर बुद्धिबळपटूंना प्रेरणा देईल. मी रशियाच्या संघालाही शुभेच्छा देतो.
Congratulations to our chess players for winning the FIDE Online #ChessOlympiad. Their hard work and dedication are admirable. Their success will surely motivate other chess players. I would like to congratulate the Russian team as well.
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2020
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनीही या निमित्ताने भारतीय संघाला शुभेच्छा दिल्या. त्यांनी लिहिलं आहे की, बुद्धिबळ ऑलिम्पियाड जिंकल्याबद्दल भारतीय संघाचं अभिनंदन. तुम्ही देशाचं नावं उज्ज्व केलं. रशियन संघाचंही अभिनंदन.
Congratulations Indian team, on winning the online FIDE Chess Olympiad.
You’ve made the country proud. Congrats to the Russian team too. pic.twitter.com/uGxorV8Mcb — Rahul Gandhi (@RahulGandhi) August 30, 2020