Vinesh Phogat Paris Olympics Disqualification : विनेश फोगटसाठी सर्व ते पर्याय तपासा, पंतप्रधान मोदींनी फोन फिरवला, IOA अध्यक्ष पीटी उषांशी चर्चा
Vinesh Phogat Paris Olympics Disqualification : महिला कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत.
Vinesh Phogat Paris Olympics Disqualification : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics) 50 किलो वजनी गटात अंतिम सामन्यापूर्वीच भारताची कुस्तीपटू विनेश फोगटला अपात्र ठरवल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. पॅरिस ऑलिम्पिक मध्ये हातातोंडाशी आलेले पदक हिरावले गेल्याने विनेश फोगाट (Vinesh Phogat) आणि भारतीय चमूला मोठा धक्का बसला आहे. या घटनाक्रमावर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. या प्रकरणावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
विनेश फोगाट ऑलिम्पिकमधून अपात्र ठरली आहे. विनेश फोगाट 50 किलो फ्रीस्टाइलच्या गटात खेळत होती. मात्र तिचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे विनेश फोगाटला अपात्र ठरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. मात्र, अंतिम सामन्यापूर्वी काही तास आधीच विनेशचे वजन 50 किलोंपेक्षा अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आले. पॅरिसमधील भारताचा ऑलिम्पिक चमू आणि देशभरातील नागरिकांना धक्का बसला आहे.
विनेशला अपात्र ठरवल्यानंतर पंतप्रधान मोदी यांनी विनेशला धीर देणारे ट्वीट केले. पंतप्रधान मोदी यांनी आपल्या ट्वीटमध्ये म्हटले की, विनेश, तू चॅम्पियन आहेस! तू भारताचा अभिमान आहात आणि प्रत्येक भारतीयांसाठी प्रेरणा आहे. आज सगळ्यांनाच धक्का बसला आहे. मला माहित आहे की, आव्हान स्वीकारणे हा तुझा स्वभाव आहे. तू मजबूतीने कमबॅक करशील असे पंतप्रधान मोदी यांनी म्हटले.
Vinesh, you are a champion among champions! You are India's pride and an inspiration for each and every Indian.
— Narendra Modi (@narendramodi) August 7, 2024
Today's setback hurts. I wish words could express the sense of despair that I am experiencing.
At the same time, I know that you epitomise resilience. It has always…
पंतप्रधान मोदी अॅक्शनमोडमध्ये...
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष पीटी उषा यांच्याशी चर्चा केली आहे. पंतप्रधान मोदी यांनी पीटी उषा यांच्याकडून या विषयावर आणि विनेशला अपात्र ठरवल्यानंतर आता भारताकडे कोणते पर्याय आहेत याबद्दल प्राथमिक माहिती घेतली असल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंतप्रधान मोदींनी पी. टी. उषा यांना विनेश फोगटच्या प्रकरणात तिला मदत करण्यासाठी सर्व पर्यायांचा शोध घेण्यास सांगितले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विनेशला मदत होणार असेल तर तिच्या अपात्रतेबद्दल तीव्र निषेध नोंदवावा, अपील दाखल करावे अशीही सूचना पीएम मोदी यांनी पीटी उषा यांना केली आहे.
विनेशच्या प्रकरणात नेमकं काय घडलं?
विनेश फोगाटचे वजन जास्त असल्याचे लक्षात आल्यानंतर मंगळवारी रात्रभर भारतीय पथकाकडून रात्रभर हालचाली सुरु होत्या. मात्र, बुधवारी सकाळी झालेल्या तपासणीवेळी विनेश फोगाटचे वजन 50 किलोपेक्षा 100 ग्रॅम जास्त असल्याचे आढळून आले. यानंतर विनेश फोगाटकडून कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. आता ऑलिम्पिकसाठी गेलेल्या भारतीय पथकाकडून उर्वरित सामन्यांवर लक्ष केंद्रित केले जात आहे.
स्पर्धेच्या नियमांनुसार, स्पर्धेच्या दोन्ही दिवशी कुस्तीपटूंना त्यांच्या वजन श्रेणीत राहावे लागते. परंतु तिचे वजन 100 ग्रॅम जास्त असल्याचं आढळून आल्याचं सांगण्यात येत आहे. विनेश फोगाट रौप्य आणि कांस्य पदकासाठीही पात्र होणार नाही.