Tokyo Olympics: ऑलिम्पिकमध्ये भारताला उद्या बॅडमिंटन, बॉक्सिंग आणि हॉकीमध्ये पदकांची अपेक्षा
रविवारी ऑलिम्पिकमध्ये पीव्ही सिंधू आणि सतीश कुमार यांच्याकडून पदकांची अपेक्षा आहे. याशिवाय हॉकी संघ उद्या उपांत्यपूर्व फेरीचा सामनाही खेळणार आहे.
Tokyo Olympics 1 August: टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतासाठी शनिवारचा दिवस निराशाजनक गेला. बॅडमिंटन एकेरीच्या उपांत्य फेरीत पीव्ही सिंधू चिनी खेळाडूकडून पराभूत झाली. तर बॉक्सिंगमध्ये अमित पंघाल आणि पूजा राणीलाही त्यांच्या सामन्यांमध्ये पराभवाला सामोरे जावे लागले. यामुळे भारताला पदक मिळण्याच्या आशेला मोठा धक्का बसला आहे. पण, रविवारी देशाला पदक मिळण्याची आशा आहे. रविवारी ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंचे वेळापत्रक जाणून घेऊ.
सिंधू कांस्यपदकासाठी खेळणार
जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ताइ जू यिंगविरुद्ध उपांत्य फेरीत पराभूत होऊनही पीव्ही सिंधूकडून पदकाची आशा अजूनही कायम आहे. कांस्यपदकासाठीच्या सामन्यात सिंधू रविवारी संध्याकाळी पाच वाजल्यापासून चिनी खेळाडूशी खेळेल. सिंधू कांस्यपदकासह तिचा ऑलिम्पिक प्रवास पूर्ण करेल अशी अपेक्षा आहे. उपांत्य फेरीच्या सामन्यात सिंधूच्या पराभवामुळे भारताचे सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.
सतीश कुमार बॉक्सिंगमध्ये क्वार्टर फायनल खेळणार
सकाळी 9.36 वाजता भारताचा सतीश कुमार बॉक्सिंगच्या सुपर हेवीवेट प्रकारात उझबेकिस्तानच्या बखोदिर जलोलोवविरुद्ध उपांत्यपूर्व फेरीत खेळेल. हा सामना जिंकून सतीश त्याच्या नावावर पदक पक्क करू शकतो. हा सामना खूप अवघड असणार आहे, कारण बखोदिर जलोलोव त्याच्या श्रेणीतील जगातील अव्वल बॉक्सर आहे. मात्र, आतापर्यंत सतीशने चांगला खेळ दाखवला आहे आणि तो हा सामना जिंकू शकतो.
हॉकी क्वार्टर फायनल सामना खेळला जाईल
भारतीय पुरुष हॉकी संघाने साखळी सामन्यात 4 विजय नोंदविल्यानंतर रविवारी उपांत्यपूर्व लढतीत खेळेल. ग्रेट ब्रिटनचा संघ भारतीय संघासमोर असेल. भारतीय संघाने आतापर्यंत चमकदार कामगिरी केली आहे. यावेळी हॉकी संघ देशासाठी पदक आणेल अशी अपेक्षा आहे.
पीव्ही सिंधूचं सुवर्णपदकाचं स्वप्न भंगलं!
भारतीय बॅडमिंटन स्टार पीव्ही सिंधूचे टोकियो ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक जिंकण्याचे स्वप्न भंगले. शनिवारी टोकियो येथे महिला एकेरीच्या उपांत्य फेरीत जागतिक क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या ताइ जु यिंगकडून सरळ गेममध्ये पीव्ही सिंधूपराभूत झाली. रिओ ऑलिम्पिक रौप्यपदक विजेती सिंधूने पहिल्या गेममध्ये ताइ जुविरोधात मोठं आव्हान उभे केलं होतं. पण 40 मिनिटांच्या लढतीत 18-21, 12-21 असा पीव्ही सिंधूचा पराभव झाला.