अमन सेहरावतने 10 तासात 4.6 किलो वजन घटवलं, जे विनेश फोगाटसोबत घडलं, ते अमनने टाळलं, रात्रभर जीममध्ये घाम गाळला!
Aman Sehrawat Paris Olympics 2024: अमन सेहरावतने कुस्तीत ऑलिम्पिकचे कांस्य पदक जिंकले खरे, पण त्याचेही वजन आधल्या रात्री तब्बल साडे चार किलोने जास्त वाढले होते.
Aman Sehrawat Paris Olympics 2024: भारताचा युवा कुस्तीपटू अमन सेहरावत (Aman Sehrawat) याने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये (Paris Olympics 2024) फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत पुरुषांच्या 57 किलो वजनी गटात प्युटर्टो रिकोच्या डॅरियन टोई क्रूझ याला 13-5 अशा फरकाने पराभूत करताना कांस्यपदक जिंकले. अमनने कांस्यपदक उंचावत अखेर कुस्तीतील पदकाची परंपरा कायम राखली. अमन सेहरावतच्या या विजयानंतर त्याच्या सपोर्ट स्टाफ पैकीच एक असणाऱ्या कुस्ती कोच जगमेंद्र सिंह यांनी 'एबीपी माझा'शी बोलताना एक महत्वाची माहिती दिली.
कांस्य पदकाच्या लढतीपूर्वी अमन सेहरावतचं वाढलेलं वजन-
अमन सेहरावतने कुस्तीत ऑलिम्पिकचे कांस्य पदक जिंकले खरे, पण त्याचेही वजन आधल्या रात्री तब्बल साडे चार किलोने जास्त वाढले होते. कांस्य पदकाच्या सामन्यापूर्वी रात्री त्याचे वजन सपोर्ट स्टाफने आटोक्यात आणले, असं कोच जगमेंद्र सिंह यांनी सांगितले. अमनने कांस्य पदकाच्या सामन्यापूर्वी 2-3 तास जॅकेट घातले होते. अमनने कांस्य पदकाच्या सामन्यापूर्वी संपूर्ण रात्र जिममध्ये घाम गाळला. यासोबत भरपूर जॉगिंगही केले. दरम्यान 100 ग्रॅम वजन जास्त असल्यानं कुस्तीपटू विनेश फोगाटला (Vinesh Phogat) फायनलमधून अपात्र करण्यात आले होते. यामुळे अमन सेहरावतच्या कांस्य पदकाच्या सामन्याआधी पूर्णपणे तयारी करण्यात आली होती. विनेश फोगाटसारखा प्रकार घडू नये, यासाठी अमन सेहरावतच्या सपोर्टस्टाफने काळजी घेतली होती.
अमनने सुरुवातीच्या दोन्ही लढती जिंकल्या होत्या-
तत्पूर्वी, अमन सेहरावतला उपांत्य फेरीत जपानच्या अव्वल मानांकित रेई हिगुचीकडून पराभव पत्करावा लागला होता. या पराभवाने त्याचे सुवर्ण पटकवण्याचे स्वप्न भंगले होते. हरियाणाच्या अमनने सुरुवातीच्या दोन्ही लढती जिंकल्या होत्या. शिवाय, त्याने प्री-क्वार्टर फायनलमध्ये माजी युरोपियन चॅम्पियन नॉर्थ मॅसेडोनियाच्या व्लादिमीर एगोरोव्हचा 10-0 ने पराभव केला होता. यानंतर त्याने क्वार्टर फाइनलमध्ये अल्बेनियाच्या झेलीमखान अबाकारोव्हचा 12-0 असा पराभव केला होता.
विनेश फोगाटला ठरवले होते अपात्र-
वास्तविक, भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटलाला 100 ग्रॅम जास्त वजनामुळे अपात्र ठरवण्यात आले होते. उपांत्यपूर्व आणि उपांत्य फेरीत तिने चमकदार कामगिरी केली. मात्र सुवर्णपदकाच्या सामन्यापूर्वी त्याचे वजन प्रमाणापेक्षा जास्त असल्याचे आढळून आले. या कारणास्तव विनेश फोगाटला अपात्र ठरवण्यात आले. या निर्णयावरुन भारताने सीएएसकडे धाव घेतली आहे. विनेश फोगाटला रौप्य पदक देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.
आज किंवा उद्या निकाल-
मिळालेल्या माहितीनूसार, विनेश फोगट आणि युनायटेड वर्ल्ड रेसलिंग (UWW) यांच्यात सुमारे तासभर चर्चा झाली. या प्रकरणाची सुनावणी कदाचित पुढे चालणार नाही आणि लवकरच निकाल दिला जाऊ शकतो. आज आणि उद्या निकाल जाहीर होण्याचीही शक्यता आहे. विनेशच्या प्रकरणावर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितिचे अध्यक्ष थॉमस बाक म्हणाले की, विनेश फोगटच्या भावना मी समजू शकतो. पण, अशा परिस्थितींमध्ये सवलत दिल्यानंतर नेमकी रेषा कुठे काढायची याबद्दलही मला खात्री नाही. तिने क्रीडा लवादाकडे दाद मागितली आहे आणि शेवटी सीएएसचा जो निर्णय येईल तो आम्ही मान्य करू, असं थॉमस बाक यांनी सांगितले.