आरसीबीचा पराभवाचा चौकार! आता युपीने 10 विकेट्सनं नमवलं, अॅलिसा हेलीनं 96 धावा चोपल्या
RCB-W vs UPW-W, Match Highlights : महिला आयपीएल स्पर्धेत आरसीबीला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. आज झालेल्या सामन्यात युपी वॉरियर्स संघाने आरसीबीचा दहा विकेट्सने पराभव केला.
RCB-W vs UPW-W, Match Highlights : महिला आयपीएल स्पर्धेत आरसीबीला पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला. आज झालेल्या सामन्यात युपी वॉरियर्स संघाने आरसीबीचा दहा विकेट्सने पराभव केला. आरसीबीचा हा सलग चौथा पराभव होय. या स्पर्धेत आरीसीबीला अद्याप विजयाचं खाते उघडता आलेलं नाही.
प्रथम फलंदाजी करताना आरसीबीने 138 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल युपी संघाने 13 षटकात हे आव्हान सहज पार केले. युपीची कर्णधार अॅलिसा हेली हिने विस्फोटक फलंदाजी केली. हेलीने नाबाद 96 धावांची खेळी केली. तर देविका वैदय हिने नाबाद 36 धावांचं योगदान दिले.
RCB in WPL 2023:
— Johns. (@CricCrazyJohns) March 10, 2023
- Lost by 60 runs vs Delhi
- Lost by 9 wickets vs Mumbai
- Lost by 11 runs vs Gujarat.
- Lost by 10 wickets vs UP.
आरीसीबीने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पण युपीच्या गोलंदाजांनी टिच्चून मारा केला. सलामी फलंदाज आणि कर्णधार स्मृती मंधाना अवघ्या चार धावा काढून माघारी परतली. सोफी डिवाइन आणि एलिसा पेरी यांनी आरसीबीचा डाव सावरला. एलिसा पेरी हिने 52 धावांची खेळी केली. तर सोफी डिवाइन हिने 36 धावांचं योगदान दिले. पण त्यानंतर आरसीबीची फलंदाजी ढेपाळली. आरसीबीने ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. कनिका आहुजा 8, हेथर नाईट 2, श्रेयंका पाटील 15, एरीन बर्न्स 12 आणि ऋचा घोष 1 यांना आपल्या लौकिकास साजेशी खेली करता आली नाही. परिणाणी आरसीबीचा संघ 20 षटकेही फलंदाजी करु शकला नाही. 19.3 षटकात आरसीबीच्या संघाने सर्वबाद 138 धावांपर्यंत मजल मारली.
युपीकडून सोफी एक्लेस्टोन हिने भेदक मारा केली. सोफी एक्लेस्टोन हिने 3.3 षटकात 13 धावांच्या मोबदल्यात 4 विकेट्स घेतल्या. तर दिप्ती शर्माने तीन फलंदाजांना तंबूत धाडले. त्याशिवाय राजेश्वरी गायकवाड हिला एक विकेट मिळाली.
आरसीबीने दिलेलं 139 धावांचे आव्हान युपीने सहज पार केले. कर्णधार अॅलिसा हेली आणि देविका वैदय या दोघांनी युपीला सहज विजय मिळवून दिला. दोघींनी 13 षटकात 139 धावांची भागिदारी केली. देविका वैदय हिने 31 चेंडूत 36 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने 5 चौकार लगावले. कर्णधार अॅलिसा हेली हिने 47 चेंडूत नाबाद 96 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान अॅलिसा हेली हिने 18 चौकारांचा पाऊस पाडला तर एक गगनचुंबी षटकार लगावला. अॅलिसा हेली हिच्यापुढे आरसीबीची गोलंदाजांनी गुडघे टेकले. आरसीबीला एकही विकेट घेण्यात यश आले नाही.