जोनासनची अष्टपैलू खेळी, दिल्लीचा युपी वॉरिअर्सवर 42 धावांनी विजय
Womens Premier League 2023 : जेस जोनासन हिने अष्टपैलू खेळी केली. दमदार प्रदर्शन केल्यामुळे तिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले.
Delhi Capitals Women vs UP Warriorz, Womens Premier League 2023 : दिल्ली कॅपिटल्सने युपी वॉरिअर्सचा 42 धावांनी पराभव केला. दिल्लीने दिलेल्या 212 धावांचा पाठलाग करताना युपीचा संघ 169 धावांपर्यंत मजल मारु शकला. मेग लेनिंग हिच्या नेतृत्वातील दिल्ली संघाचा हा लागोपाठ दुसरा विजय होय. पहिल्या सामन्यात दिल्लीने आरसीबीचा पराभव केला होता. तर युपीचा हा पहिलाच पराभव आहे. युपीने पहिल्या सामन्यात गुजरातचा पराभव केला होता.
यूपी वारियर्सला विजयासाठी विजयासाठी 212 धावांचे आव्हान मिळाले होते. पण युपीचा संघ निर्धारित 20 षटकात पाच विकेट्सच्या मोबदल्यात 169 धावांपर्यंत मजल मारता आली. युपी वारियर्ससाठी ताहिला मॅक्ग्राथ हिने सर्वाधिक धावा केल्या. ताहिला मैक्ग्राथ हिने 50 चेंडूत नाबाद 90 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान तिने 11 चौकार आणि चार षटकार लगावले. त्याशिवाय एलिसा हीली हिने 17 चेंडूत 24 धावांची खेळी केली. देविका वैद हिने 23 धावांचे योगदान दिले. यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला लौकिकास साजेशी कामगिरी करता आली नाही. दिल्ली कॅपिट्लसकडून जेस जोनासन हिने तीन विकेट्स घेतल्या. त्याशिवाय मेरिजन कॅप आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतल्या.
दिल्लीने मोडला मुंबईचा विक्रम -
दिल्लीच्या संघाने प्रथम फलंदाजी करताना चार विकेट्सच्या मोबदल्यात 211 धावांचा डोंगर उभारला. वुमन्स प्रीमियर लीगमधील ही सर्वाधिक धावसंख्या होय. याआधी हा विक्रम मुंबईच्या नावावर होता. मुंबईने पहिल्याच सामन्यात 207 धावांचा डोंगर उभारला होता. आज दिल्लीने प्रथम फलंदाजी करताना चार विकेट्सच्या मोबदल्यात 211 धावा चोपल्या. दिल्ली कॅपिटल्सकडून कर्णधार मेग लेनिंग हिने 42 चेंडूत 72 धावांचा पाऊस पाडला. या खेळीदरम्यान 10 चौकार आणि तीन षटकार लगावले. मेग लेनिंग आणि शेफाली वर्मा यांनी पहिल्या विकेट्ससाठी 6.3 षटकात 67 धावांची भागिदारी. त्याशिवाय जेमिमा रॉड्रिग्स आणि जेस जोनासन यांनी फिनिशिंग टच दिला... जेस जोनासन हिने 20 चेंडूत नाबाद 42 धावा केल्या. या खेळीदरम्यान तिने तीन चौकार आणि तीन षटकारांचा पाऊस पाडला. जेमिमा रॉड्रिग्सने 22 चेंडूत नाबाद 34 धावांची छोटेखानी खेळी केली. या खेळीदरम्यान तीने चार चौकार लगावले. एलिस कॅप्सी हिने 10 चेंडूत 21 धावांची वेगवान खेळी केली. त्याशइवाय शेफाली वर्मा आणि मेरिजन कॅप यांनी अनुक्रमे 17 आणि 16 धावांचे योगदान दिले.
यूपी वारियर्सची गोलंदाजी कशी राहिली ?
दिल्लीच्या गोलंदाजीपुढे यूपी वारियर्सची गोलंदाजी कमकुवत जाणवत होती. एकाही गोलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी गोलंदाजी करता आली नाही. विकेट घेण्यात अपयश आले पण धावाही रोखता आल्या नाहीत. सबनिम इस्माइल, राजेश्वरी गायकवाड, ताहिला मैक्ग्राथ आणि सोफी एस्केस्टोन यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.