कोहली 'विराट' असला तरी देवमाणूस नक्कीच नाही! 33 षटकार अन् स्ट्राईक रेट 155, आणखी काय करावं?
Virat Kohli IPL 2024 : आयपीएलमध्ये विराट कोहलीला संथ फलंदाजीमुळे ट्रोल करण्यात आले. पण त्यामध्ये किती तथ्य आहे. पाहूयात विराट कोहलीच्या आकड्याबद्दल
Virat Kohli IPL 2024 : विराट कोहली सध्या भन्नाट फॉर्मात आहे. आयपीएलमध्ये तो चौकार आणि षटकारांचा पाऊस पाडतोय. विराट कोहली सध्या 35 वर्षांचा आहे. या वयामध्ये खेळाडूंवर निवृत्तीचा दबाव असतो. रोहित शर्मा याच्यावरही निवृत्तीचा दबाव आहे. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत त्यानं आताच निवृत्ती घेणार नसल्याचं सांगितलं. दुसरीकडे विराट कोहली 35 व्या वर्षातही शानदार कामगिरी करत आहे. आयपीएलमध्ये त्याला संथ फलंदाजीमुळे ट्रोल करण्यात आले. पण त्यामध्ये किती तथ्य आहे. पाहूयात विराट कोहलीच्या आकड्याबद्दल
रोहित शर्मापेक्षा विराट कोहलीचा स्ट्राइक रेट शानदार
आयपीएल 2024 मध्ये विराट कोहलीला स्ट्राईक रेटवरुन जोरदार ट्रोल करण्यात आलेय. पण आयपीएलच्या इतिहास पाहिला तर विराट कोहलीचा यंदाचा स्ट्राईक रेट सर्वाधिक आहे. विराट कोहलीने यंदाच्या हंगामात 156 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी केली. ऋतुराज गायकवाड (141.5), केएल राहुल (136.36), शुभमन गिल (147.4) आणि रोहित शर्मा (145.4) यांच्यापेक्षा विराट कोहलीचा स्ट्राईक रेट शानदार राहिलाय. मागील सात डावात तर विराट कोहलीने 170 पेक्षा जास्त स्ट्राईक रेटने धावांचा पाऊस पाडलाय. आकडेवारी पाहिल्यास विराट कोहलीला स्ट्राईक रेटवरुन ट्रोल करणं चुकीचं असल्याचे दिसतेय.
षटकारांचा पाऊस पाडतोय विराट -
हिटिंग करण्यापेक्षा विराट कोहली टायमिंग क्रिकेट खेळण्यावर जास्त भर देतोय. विराट कोहलीला षटकार मारण्यापेक्षा चौकारांसाठी ओळखलं जातं. पण यंदाच्या हंगामात विराट कोहलीचं वेगळ रुप पाहायला मिळालं. विराट कोहलीने यंदाच्या हंगामात षटकारांचा पाऊस पाडलाय. यंदाच्या हंगामात सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली दुसऱ्या क्रमांकावर आहे. सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा, शिवम दुबे हे फलंदाज विराट कोहलीच्या आजूबाजूलाही नाहीत. विराट कोहलीने यंदाच्या हंगामात 13 डावात 33 षटकार लगावले आहेत. विराट कोहलीपेक्षा जास्त षटकार अभिषेक शर्माच्या नावावर आहे. अभिषेक शर्मानं 35 षटकार ठोकले आहेत. त्यानंतर 33 षटकारांसह विराट कोहलीचा क्रमांक लागतो. ट्रेविस हेड, निकोलस पूरन आणि हेनरिक क्लासेन यासारखे पॉवर हिटरही विराट कोहलीच्या मागे आहेत.
विराट कोहलीच्या फलंदाजीत सातत्य -
रनमशीन विराट कोहलीच्या फलंदाजीवरही प्रश्न उपस्थित कऱण्यात आले. विराट कोहलीच्या फलंदाजीत सातत्य नाही, असा सूर अनेकांनी उपस्थित केला. याचं उत्तर आकड्यातूनच मिळेल. विराट कोहलीने 13 डावात 66 च्या सरासरीने 661 धावांचा पाऊस पाडलाय. यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली पहिल्या स्थानावर आहे. विराट कोहलीच्या डोक्यावर ऑरेंज कॅप आहे. दुसऱ्या क्रमांकावर असणाऱ्या ऋतुराज गायकवाड हा विराट कोहलीपेक्षा 78 धावा मागे आहे. विराट कोहलीने 13 डावात एक शतक आणि पाच अर्धशतके ठोकली आहे. विराट कोहलीने आठ डावात 40 किंवा त्यापेक्षा जास्त धावा चोपल्या आहेत. हा विराट कोहलीच्या सातत्याचा पुरवा आहे. शानदार फलंदाजीनंतरही विराट कोहलीला ट्रोल करणं कितपत योग्य आहे.