(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2025 : हार्दिक पांड्यासाठी मित्रच ठरला 'व्हिलन'? मुंबईच्या कर्णधारपदाबाबत केलं मोठं वक्तव्य
Suryakumar Yadav on IPL Captaincy Mumbai Indians : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने मोठा बदल केला होता. त्यांनी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्त केली.
IPL 2025 Mumbai Indians Captaincy : आयपीएल 2024 मध्ये मुंबई इंडियन्सने मोठा बदल केला होता. त्यांनी रोहित शर्माच्या जागी हार्दिक पांड्याची कर्णधार म्हणून नियुक्त केली. मात्र, त्या हंगामात हार्दिकच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने खराब कामगिरी केली आणि गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला. एमआयला फक्त 4 सामने जिंकता आले. अशा परिस्थितीत आता आयपीएल 2025 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. दरम्यान, एका भारतीय खेळाडूच्या एका विधानामुळे चाहते तर्क वितर्क लावू लागले. तो आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याची जागा घेऊ शकतो.
भारत सध्या बांगलादेशविरुद्ध 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादव आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून प्रबळ दावेदार असल्याचे बोलले जात आहे. अशा स्थितीत मुंबई इंडियन्स साहजिकच त्याला संघात कायम ठेवणार आहे. सूर्यकुमार यादवने बांगलादेशविरुद्धच्या टी-20 सामन्याच्या तयारीदरम्यान आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदाशी संबंधित प्रश्नांची उत्तरे दिली.
यादरम्यान सूर्यकुमार हसत म्हणाला की, तुम्ही गुगली प्रश्न विचारला. मी सध्या भारतीय संघाचा कर्णधार म्हणून माझ्या नव्या भूमिकेचा आनंद घेत आहे. जेव्हा मी रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सकडून खेळायचो तेव्हा त्याच्या सांगण्यावरून मी माझे मत अनेकदा व्यक्त केले आहे. श्रीलंकेविरुद्ध टी-20 कर्णधार म्हणून माझी नवीन भूमिका सुरू करण्यापूर्वीच मी ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिकेविरुद्ध संघाचे नेतृत्व केले आहे. अशा परिस्थितीत संघाला पुढे नेण्याबाबत मी सर्व कर्णधारांकडून शिकलो आहे. तूर्तास, पुढे जे होईल ते कळेल.
सूर्यकुमार यादवच्या या विधानामुळे चर्चेला उधाण आले आहे की, तो मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद भूषवू शकतो. मात्र, याप्रकरणी मुंबई इंडियन्स व्यवस्थापन काय निर्णय घेते, हे साहजिकच लक्षवेधी ठरणार आहे.
सूर्यकुमार यादवची आयपीएल कारकीर्द
सध्याचा भारतीय टी-20 कर्णधार सूर्यकुमार यादवने आयपीएल 2012 मध्ये मुंबई इंडियन्सकडून पदार्पण केले. त्यानंतर तो आयपीएल 2014 ते आयपीएल 2017 पर्यंत कोलकाता नाइट रायडर्सचा भाग होता. आयपीएल 2018 मध्ये मुंबई इंडियन्समध्ये पुनरागमन केल्यानंतर सूर्यकुमार यादव आतापर्यंत या संघाचा एक भाग आहे. या कालावधीत सूर्यकुमार यादवने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण 150 सामने खेळले आहेत आणि 145.32 च्या स्ट्राइक रेटने 3594 धावा केल्या आहेत, ज्यात 2 शतके आणि 24 अर्धशतकांचा समावेश आहे.
हे ही वाचा -