Ruturaj Gaikwad : ना तुषार देशपांडे, ना पथिराना, ऋतुराज गायकवाडनं तिसऱ्याच बॉलरचं कौतुक केलं, म्हणाला मॅच विनिंग स्पेल...
IPL 2024 : ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्जनं स्पर्धेतील पाचवा विजय मिळवला. यानंतर बोलताना ऋतुराज गायकवाडनं विविध गोष्टींवर भाष्य केलं.
चेन्नई : चेन्नई सुपर किंग्जनं (Chennai Super Kings) आयपीएलच्या 46 व्या लढतीत सनरायजर्स हैदराबाद (Sun Risers Hyderabad) वर 78 धावांनी विजय मिळवला. कॅप्टन ऋतुराज गायकवाड याची 98 धावांची खेळी, डॅरिल मिशेलचं अर्धशतक आणि चेन्नईनं गोलंदाजांच्या भन्नाट कामगिरीच्या जोरावर हैदराबादला पराभूत केलं. चेन्नईनं हैदराबाद विरुद्ध विजय मिळवत गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी झेप घेतली तर हैदराबादची चौथ्या स्थानी घसरण झाली. हैदराबादचा डाव 134 धावांवर आटोपला. कॅप्टन ऋतुराज गायकवाड यानं मॅच जिंकल्यानंतर पोस्ट मॅच प्रेझेंटेशनमध्ये मॅच नेमकी कुठं फिरली? कोणत्या बॉलरचा स्पेल गेमचेंजर ठरला हे सांगितलं.
ऋतुराज गायकवाडकडून रवींद्र जडेजाचं कौतुक (Ruturaj Gaikwad Praised Ravindra Jadeja )
ऋतुराज गायकवाडनं विजयानंतर बोलताना चेन्नईच्या गोलंदाजांचं कौतुक केलं. चेन्नईच्या गोलंदाजांनी 10 विकेट घेत हैदराबादला 134 धावांवर रोखलं. तुषार देशपांडेनं चार विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ मथिशा पथिराना आणि मुस्तफिजूर रहमाननं प्रत्येकी दोन विकेट घेतल्या. तर, रवींद्र जडेजा आणि शार्दूल ठाकूरनं एक विकेट घेतली. ऋतुराज गायकवाडनं मॅच नेमकी कुठं फिरली यांसदर्भात मत व्यक्त केलं. ऋतुराज गायकवाडनं रवींद्र जडेजाच्या बॉलिंगचं कौतक केलं तो म्हणाला की, "जड्डूनं मॅच विनिंग स्पेल टाकला, वेट कंडिशन असताना अशी कामगिरी करणं सोपं नसतं. माझ्यासाठी मॅच विनिंग स्पेल आहे". रवींद्र जडेजानं चार ओव्हर टाकत 22 धावा देत एक विकेट घेतली. रवींद्र जडेजानं नितीशकुमार रेड्डीची विकेट घेतली.
ऋतुराज गायकवाडनं त्याचं शतक हुकलं त्यासंदर्भात देखील भाष्य केलं. ऋतुराज म्हणाला मी माझ्या शतकाचा विचार करत नव्हतो. चेन्नईला 220-230 धावांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत होतो. चेन्नई सुपर किंग्जला आम्ही तिथपर्यंत पोहोचवू शकलो नाही, यामुळं असमाधानी असल्याचं ऋतुराज गायकवाड म्हणाला.
चेन्नई सुपर किंग्जची गुणतालिकेत मोठी झेप
चेन्नई सुपर किंग्जनं सनरायजर्स हैदराबादला 78 धावांनी पराभूत करत गुणतालिकेत मोठी झेप घेतली. यंदाच्या आयपीएलमध्ये सद्यस्थितीत 10 पैकी पाच संघांच्या नावावर 10 गुण आहेत. मात्र, नेट रनरेटच्या जोरावर त्यांच्यामध्ये क्रमवारी ठरेलली आहे. कोलकाता नाईट रायडर्स 10 गुणांसह चांगल्या नेट रनरेटमुळं दुसऱ्या स्थानावर आहे. त्यानंतर अनुक्रमे, चेन्नई सुपर किंग्ज, सनरायजर्स हैदराबाद, लखनौ सुपर जाएंटस आणि दिल्ली कॅपिटल्सचा क्रमांक लागतो. त्यामुळं आयपीएलच्या आगामी मॅचेसवर प्लेऑफमध्ये कोण प्रवेश करणार हे ठरणार आहे.