(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Priyanka Gandhi In Kolhapur : बाळासाहेब ठाकरे यांचं नाव घेतात आणि त्यांच्याच मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला; प्रियांका गांधींचा पीएम मोदींवर घणाघाती प्रहार
मोदी व्यासपीठावर येतात आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात आणि त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी कोल्हापूरमध्ये पीएम मोदी यांच्यावर हल्लाबोल केला.
कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भाषण ऐकली की दुःख होतं. सत्य आणि सकारात्मक भाषण ऐकायला मिळत नाही. याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान केला जात आहे. मोदी व्यासपीठावर येतात आणि बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात आणि त्यांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला, अशा शब्दात प्रियांका गांधी यांनी कोल्हापूरमध्ये पीएम मोदी यांच्यावर हल्लाबोल केला. कोल्हापुरातील गांधी मैदानात प्रियांका गांधी यांची पहिल्यांदाच सभा झाली.
प्रियांका गांधी म्हणाल्या की, जे नेते प्रचार करतात त्यांच्याकडून अपेक्षा असते की सकारात्मक बोलतील, चांगले विचार मांडतील, पण असं होतं नाही. मोदी छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेतात, पण शिवाजी महाराज यांचा पुतळा पडला. एके ठिकाणी काम सुरू होत ते आता बंद झालं. महागाईचा सामना सर्वजण करत आहेत. मोदी व्यासपीठावर येतात आणि लाडकी बहीण बोलतात, निवडणुकीच्या तोंडावर ही योजना आणली.आपलंच पैसे काढून घेतले आणि आता देत आहेत. निवडणुकीत पैशाच्या आधारावर, जाती धर्मावर बोलून निवडणूक जिंकता येतं, असा त्यांचा समज आहे त्यामुळे ते काम करत नाहीत. ज्या मुद्दयावर काम केलं पाहिजे ज्या मुद्दयावर चर्चा केली पाहिजे त्यावर बोललं जातं नाही.
तत्पूर्वी, प्रियांका म्हणाल्या की, ही महाराष्ट्राची पवित्र भूमी आहे. ही महापुरूषांची भूमी आहे. या भूमीतून मानवता आणि समतेचा संदेश देण्यात आला. या सर्वाची स्वातंत्र्याच्या लढाईत मोठे योगदान आहे. या भूमीत आल्यानंतर अभिमानास्पद वाटतं. महाराष्ट्राच्या भूमीचा अपमान होत आहे, शिवरायांचा सुद्धा अपमान होत आहे.
छत्रपती शिवाजी महाराज देशाचे आराध्यदैवत आहेत, पंतप्रधान नरेंद्र मोदी व त्यांचे सहकारी शिवाजी महाराज यांचे नाव घेतात पण त्यांचा सन्मान मात्र करत नाहीत. सात वर्षापूर्वी मोदींनी शिवस्मारकाचे जलपूजन केले पण ते स्मारक आजही झालेले नाही. संसदेच्या आवारातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मोदी सरकारने हटवला. मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेला मालवणमधील महाराजांचा पुतळा तर अवघ्या आठ महिन्यातच कोसळला. भाजपा सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करते, शिवरायांचा हा अपमान कदापी सहन केला जाणार नाही, असे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी ठणकावून सांगितले.
इतर महत्वाच्या बातम्या