(Source: ECI/ABP News/ABP Majha)
टी-20 वर्ल्ड कप काहीच दिवसांवर, रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालच्या फॉर्मनं वाढलं टीम इंडियाचं टेन्शन, कारण...
Rohit Sharma : आयपीएलमध्ये रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांची कामगिरी फारशी समाधानकारक झाली नसल्यानं टीम इंडियाचं टेन्शन वाढलं आहे.
मुंबई: इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलचं (IPL 2024)17 वं पर्व संपल्यानंतर 1 जूनपासून टी-20 वर्ल्ड कप सुरु होणार आहे. वर्ल्ड कप (T 20 World Cup) सुरु होणं ही क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी आहे. टीम इंडियाचे (Team India) प्रमुख खेळाडू सध्या आयपीएलमध्ये व्यस्त आहेत. आयपीएल झाल्यानंतर त्यांना केवळ एकच सराव सामना खेळायला मिळणार आहे. भारताची पहिली मॅच आयरलँड विरुद्ध 5 जूनला होणार आहे. भारतीय टीम दुसऱ्यांदा टी-20 वर्ल्ड कपवर नाव कोरण्याच्या इराद्यानं मैदानात उतरेल. मात्र, यावेळी टीम इंडियाचे सलामीवीर रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal) यांच्या आयपीएलमधील कामगिरीनं सर्वांचं टेन्शन वाढलंय.
रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल फ्लॉप
आगामी टी-20 वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल टीम इंडियाच्या डावाची सुरुवात करु शकतात. मात्र, रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यांच्या फॉर्मनं सर्वांची चिंता वाढवलीय. रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल यंदाच्या आयपीएलमध्ये त्यांच्या लोकिकाला साजेशी कामगिरी करु शकलेले नाहीत. रोहित शर्मानं मुंबई इंडियन्सकडून तर यशस्वी जयस्वालनं राजस्थान रॉयल्सकडून एक शतक झळकावलं आहे. मात्र दोघांना देखील कामगिरीत सातत्य ठेवता आलेलं नाही.
रोहितनं यंदाच्या आयपीएलमध्ये किती धावा केल्या?
टीम इंडियाला 2007 च्या टी-20 वर्ल्डकपमध्ये विजेतेपद मिळालं होतं. त्यांनतर भारताला पुन्हा टी-20 वर्ल्ड कप जिंकता आलेला नाही. रोहित शर्माचा फॉर्म हा भारतीय संघासाठी महत्त्वाचा समजला जातो. रोहित शर्मानं यंदाच्या आयपीएलमध्ये 13 मॅचेसमध्ये एका शतकासह 349 धावा केल्या आहेत. रोहित शर्माला शतक केल्यानंतरच्या पुढील काही डावांमध्ये दोन अंकी धावसंख्या देखील गाठता आलेली नव्हती. रोहित शर्मा फॉर्ममध्ये नसल्यानं त्याचा फटका मुंबई इंडियन्सला बसला आहे. मुंबई इंडियन्स 2024 च्या आयपीएल प्लेऑफच्या शर्यतीतून सर्वात अगोदर बाहेर पडलं आहे.
यशस्वी जयस्वालची कामगिरी कशी?
राजस्थान रॉयल्सचा सलामीवीर यशस्वी जयस्वालला यंदाच्या आयपीएलमध्ये 2023 प्रमाणं कामगिरी करता आलेली नाही. यशस्वी जयस्वालनं 13 मॅचमध्ये एक शतक आणि एका अर्धशतकासह 348 धावा केल्या आहेत. यशस्वी जयस्वाल देखील फॉर्ममध्ये नसल्यानं त्याचा फटका राजस्थान रॉयल्सला बसतोय. राजस्थान रॉयल्सचा कालच्या मॅचमध्ये देखील पराभव झाला.
दरम्यान, टी-20 वर्ल्डकपमध्ये भारत, पाकिस्तान, कॅनडा, आयरलँड आणि अमेरिका एकाच गटात आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील मॅच 9 जूनला होणार आहे.
संबंधित बातम्या :