IPL 2022: रियान परागचं मिशन एबी डिव्हिलियर्स! चेन्नईविरुद्ध सामन्यात मोडला रोहित शर्मा, रवींद्र जडेजाचा 'हा' विक्रम
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार प्रदर्शन करून राजस्थानच्या संघानं (Rajasthan Royals) प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे.
IPL 2022: आयपीएलच्या पंधराव्या हंगामात दमदार प्रदर्शन करून राजस्थानच्या संघानं (Rajasthan Royals) प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. शुक्रवारी चेन्नईविरुद्ध सामन्यात राजस्थानच्या संघानं 5 विकेट्स राखून विजय मिळवला. या विजयासह राजस्थानच्या संघानं आयपीएलच्या गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. या सामन्यात राजस्थानचा युवा फलंदाज रियान परागनं (Riyan Parag) नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. त्यानं आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि चेन्नईचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) यांचा विक्रम मोडला आहे.
रियान परागच्या नावावर नव्या विक्रमाची नोंद
गुवाहाटीमध्ये राहणारा 20 वर्षांचा युवा खेळाडू रियान परागसाठी हा हंगाम फारसा चांगला ठरला नाही. या हंगामातील 14 सामन्यात त्याला केवळ 164 धावा करता आल्या आहेत. यादरम्यान त्यानं केवळ एक अर्धशतक झळकावलं आहे. पण, त्यानं सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजाचा विक्रम मोडला आहे. आयपीएलच्या एका हंगामात सर्वाधिक 15 झेल घेणारा रियान हा भारतीय खेळाडू ठरला आहे. रोहित आणि जडेजाचा आयपीएलच्या एकाच हंगामात 13-13 झेल घेतले. रोहितनं 2012 च्या मोसमात ही कामगिरी केली होती. तर, जडेजानं हा विक्रम 2015 आणि 2021 च्या हंगामात म्हणजे दोन वेळा केला होता.
मिशन एबी डिव्हिलियर्स
दरम्यान, आयपीएलच्या एकाच हंगामात सर्वाधिक झेल घेण्याच्या यादीत दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्रिकेटपटू एबी डिव्हिलियर्स अव्वल स्थानी आहे. त्यानं आयपीएलच्या एकाच हंगामात तब्बल 19 झेल घेण्याचा पराक्रम केला होता. 2016 च्या आयपीएल हंगामात त्यानं हा विक्रम केला होता. या यादीत रियान कायरन पोलार्डसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. पोलार्डनं 2017 च्या हंगामात 15 झेल घेतल्या होत्या. राजस्थानचा संघ प्लेऑफमध्ये पोहोचला आहे आणि गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर आहे. यामुळं राजस्थानच्या संघाला आणखी दोन सामने खेळायचे आहेत. या दोन्ही सामन्यात रियाननं आणखी पाच झेल घेतल्यास तो एबी डिव्हिलियर्सचाही विक्रम मोडू शकतो.
हे देखील वाचा-