(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2024 Yash Dayal last Over: चेन्नईविरुद्ध सामना जिंकताच यश दयालचा आईला फोन; गेल्यावर्षी रिंकू सिंहने 5 षटकार लगावल्यानंतर पडली होती आजारी
IPL 2024 Yash Dayal last Over: सामनावीराच्या पुरस्कारासाठी बंगळुरुचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसची निवड झाल्यानंतर त्याने हा पुरस्कार यश दयालला समर्पित केला.
IPL 2024 Yash Dayal last Over: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुनं (RCB) आयपीएलच्या (IPL 2024) प्ले ऑफमध्ये प्रवेश केला आहे. चेन्नई सुपर किंग्जला (CSK) बंगळुरुनं 27 धावांनी पराभूत केलं. बंगळुरुला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासठी चेन्नईवर 18 धावांनी विजय मिळवणं आवश्यक होतं. अखेरच्या ओव्हरमध्ये चेन्नईला प्ले ऑफमध्ये पोहोचण्यासाठी 17 धावांची गरज होती. बंगळुरुच्या यश दयालने (Yash Dayal) एक विकेट घेत केवळ 7 धावा दिल्या आणि बंगळुरुचा प्ले ऑफमधील प्रवेश निश्चित केला. यश दयालने घेतलेली विकेट महेंद्रसिंह धोनीची होती त्यामुळं तिला महत्त्व आहे. या सामन्यातील सामनावीराच्या पुरस्कारासाठी बंगळुरुचा कर्णधार फाफ ड्यू प्लेसिसची निवड झाल्यानंतर त्याने हा पुरस्कार यश दयालला समर्पित केला.
शेवटच्या षटकानंतर यश दयालचा आईला फोन-
आजपासून बरोबर 405 दिवसांपूर्वी एका षटकात रिंकू सिंहने पाच षटकार लगावल्यानंतर यश दयालची कारकीर्द विस्कळीत होत असल्याचे पाहताना त्याची आई राधा आजारी पडल्या; पण चेन्नईविरुद्ध यशने टाकलेल्या एका षटकामुळे सर्व काही बदलले आहे. या कामगिरीसह यशने आईच्या आजारावर उपचारच केला आहे. जादुई कामगिरीनंतर यशने आईला व्हिडीओ कॉल केला आणि विचारले की आता कसं वाटतंय आई? त्यानंतर दयाल परिवाराने जल्लोष केला.
रिंकू सिंहची देखील पोस्ट-
केकेआरच्या रिंकू सिंहनं अभिनंदनाचा वर्षाव केला आहे. रिंकून सिंगनं यश दयालसाठी सोशल मीडियावर स्टोरी शेअर केली आहे. यश दयाळनं अखेरच्या ओव्हरमध्ये एक विकेट घेतली आणि सात धावा दिल्या. यशसमोर महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा सारखे दिग्गज खेळाडू होते. मात्र, यश दयाळनं आरसीबीला प्लेऑफमध्ये प्रवेश मिळवून दिला. रिंकू सिंहनं यश दयाळचा फोटो स्टोरीला ठेवत "भगवान की योजना यार" अशी कमेंट लिहिली.
सामना जिंकल्यानंतर यश दयाल काय म्हणाला?
गेल्या वर्षीच्या ‘आयपीएल’मधील एका सामन्यात यश दयालच्या गोलंदाजीवर सलग पाच षटकार खेचत रिंकू सिंहने कोलकाताला सामना जिंकून दिला होता. त्यानंतर दयालचा आत्मविश्वास खालावला होता. गेल्या हंगामानंतर गुजरात टायटन्सने दयालला संघमुक्त केले आणि यंदाच्या हंगामापूर्वी बंगळूरुने त्याला 5 कोटी रुपयांत संघात समाविष्ट करून घेतले. मला जुने सगळे आठवू लागले होते. मात्र, मी स्वत:च्या क्षमतेवर विश्वास ठेवला. मी धावफलक न बघता योजनेनुसार गोलंदाजीचा प्रयत्न केला. मी आमच्या संघाला सामना जिंकून देऊ शकलो याचा आनंद आहे,असे दयालने सांगितले.