राष्ट्रवादीच्या पराभवानंतर राजकीय निवृत्तीबाबत शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; निकालाबाबत स्पष्टच सांगितलं
निवडणूक निकालांमध्ये असा अनुभव आम्हाला कधी आला नाही, मात्र आता याचा अभ्यास करावा लागेल.

मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीने जल्लोष केला असून महायुतीमधील (Mahayuti) घटक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी पत्रकार परिषद घेऊन विजयाबद्दल महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानले. तसेच, यंदाच्या निवडणुकीत लाडक्या बहिणींना आम्हाला भरगोस मतदान केलं, लाडकी बहीण योजना गेमचेंजर ठरली, असंही अजित पवार यांनी म्हटलं होतं. तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिवसेना युबीटी पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनीही पत्रकार परिषद घेऊन पराभवावर भाष्य केलंय. शिवसेना प्रवक्ते खा. संजय राऊत यांनी हा निकाल मान्य नसल्याचं सांगत ईव्हीएमवर संशय व्यक्त केला आहे. त्यानंतर, आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार (Sharad pawar) यांनी पत्रकार परिषद घेऊन पराभव स्वीकरत असल्याचे म्हटले. मात्र, आमची अपेक्षा होती तसा निकाल लागला नाही, पण शेवटी लोकांनी दिलेला निर्णय आहे, अशा शब्दात निकालावर भाष्य केलं.
निवडणूक निकालांमध्ये असा अनुभव आम्हाला कधी आला नाही, मात्र आता याचा अभ्यास करावा लागेल. आम्ही पुन्हा एकदा जोमाने कामाला लागू असे शरद पवारांनी म्हटले. त्यावेळी, शरद पवारांना राजकीय निवृत्तिबाबतही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, मी निवृत्त व्हावं की नाही, हे मी आणि माझे सहकारी ठरवतील असेही शरद पवार यांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे निवडणुकांच्या अगोदरच त्यांनी आपल्या राजकीय निवृत्तीबाबत भाष्ये केलं होतं. दीड वर्षात माझी खासदारकीची टर्म संपत आहे. यापुढे संसदेत जायचं की नाही, हे विचार करावं लागेल असेही त्यांनी म्हटले होते. त्यामुळे, शरद पवारांच्या निवृत्तीबाबत कायमच प्रश्न विचारले जातात. विधानसभा निवडणुकीतील निकालानंतर, राष्ट्रवादीच्या पराभवानंतर आजही त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर, हे मी आणि माझे सहकारी ठरवतील असे स्पष्ट उत्तर त्यांनी दिले.
लाडकी बहीण परिणामकारक
राज्यातील विधानसभा निवडणुकीत यंदा लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना थेट बँक खात्यात रक्कम देण्यात आली. तसेच, आम्ही सत्तेत नसलो तर हे पैसे बंद होतील असा प्रचार करण्यात आला. त्यामुळे, कदाचित महिलांनी मत महायुतीला दिल्याचं दिसून येतंय, असे म्हणत लाडकी बहीण योजनेचा परिणाम झाल्याचं शरद पवार यांनी मान्य केलंय.
ईव्हीएमच्या संशयावर पवारांचं स्पष्टीकरण
लोकसभेला जो नागरिकांनी निर्णय घेतला त्यामुळे आमच्यात अधिकचा विश्वास होता. महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांनी काम केलं, कोण मागं राहिलं नाही. ईव्हीएमबद्दल मला अधिकृत माहिती घेतल्याशिवाय आत्ताच काही सांगता येणार नाही. पण, पैशाचा वापर आतापर्यंत असा कधी पहायला मिळाला नव्हता, असे म्हणत पैशाचा मोठ्या प्रमाणात वापर झाल्याचंही पवारांनी म्हटलं.
हेही वाचा
Nitesh Rane: भगवी शाल घालून फडणवीसांचा सत्कार; उपमुख्यमंत्र्याच्या कृतीने लाजले आमदार नितेश राणे





















