अंपायरने नाबाद दिल्यानंतरही डिकॉक परतला तंबूत, गोलंदाजानेही थोपटली पाठ
IPL 2022 Marathi News : लखनौच्या विजायापेक्षा शुक्रवारी डिकॉकच्या खिलाडूवृत्तीची चर्चा होत आहे. अंपायरने नाबाद दिल्यानंतरही डिकॉक तंबूत परतला.
IPL 2022 Marathi News : लखनौ सुपर जायंट्सने पंजाब किंग्सविरोधात 154 धावांच्या माफक आव्हानाचा यशस्वी बचाव केला. शुक्रवारी झालेल्या सामन्यात लखनौने पंजाबचा 20 धावांनी पराभव केला. या सामन्यात लखनौच्या गोलंदाजांनी भेदक मारा केला. या सामन्यात लखनौकडून क्विंटन डिकॉकने संयमी फलंदाजी केली. डिकॉकने लखनौकडून सर्वाधिक धावा केल्या. डिकॉकने 37 चेंडूत 46 धावांची खेळी केली. लखनौच्या विजायापेक्षा शुक्रवारी डिकॉकच्या खिलाडूवृत्तीची चर्चा होत आहे. अंपायरने नाबाद दिल्यानंतरही डिकॉक तंबूत परतला.
शुक्रवारी पंजाबचा कर्णधार मयांक अग्रवाल याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. राबाडाने तुफान फॉर्ममध्ये असणाऱ्या केएल राहुलचा अडथळा दूर केला. त्यानंतर डिकॉक आणि दीपक हुडा यांनी पंजाबची गोलंदाजी फोडून काढली. राहुल लवकर बाद झाल्यानंतर लखनौने पॉवरप्लेमध्ये 39 धावा जमवल्या. 13 व्या षटकात संदीप शर्माच्या शॉर्ट पिच चेंडूवर पंजाबच्या विकेटकिपरने डिकॉक बाद असल्याची दाद मागितली. पंचाने हा निर्णय फेटाळून लावला. यावेळी डिकॉकने खिलाडूवृत्ती दाखवत बाद असल्याचे सांगत मैदान सोडले. डिकॉकच्या या निर्णायानंतर संदीप शर्माने त्याची पाठ थोपाटली.
डिकॉक आणि दीपक हुडा यांनी दुसऱ्या विकेटसाठी 85 धावांची भागिारी केली. डिकॉकने चार चौकार आणि दोन षटकारासह 46 धावांची खेळी केली. तर दीपक हुड्डाने दोन षटकार आणि एका चौकारासह 34 धावांची खेळी केली. या दोघांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात अपयश आलेय. लखनौने निर्धारित 20 षटकात आठ गड्यांच्या मोबदल्यात 153 धावा केल्या. 154 धावांचा पाठलाग करताना लखनौच्या भेदक माऱ्यापुढे पंजाबची फलंदाजी ढेपाळली. कर्णधार मयांक अग्रवाल 25 आणि जॉनी बेयस्टो 32 यांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करण्यात यश मिळाले नाही. शिखर धवन 5, भानुका राजपक्षे 9, लियाम लिव्हिंगस्टोन 18, जितेश शर्मा 2, रबाडा 2, राहुल चाहर 4 यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले. अष्टपैलू ऋषी धवन याने अखरेच्या षटकात फटकेबाजी करत 21 धावांची खेळी केली. पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती. लखनौकडून मोहसीन खान सर्वोत्कृष्ट गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात तीन विकेट घेतल्या. त्याशिवाय दुष्मंता चामिरा आणि क्रृणाल पांड्या यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. रवी बिश्नोईला एक विकेट मिळाली.