Operation Sindoor: भारताचं ऑपरेशन सिंदूर सुरु, आयपीएलचा मोठा निर्णय, पंजाब-मुंबई मॅच संदर्भात नवी अपडेट
Operation Sindoor : भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी ऑपरेशन सिंदूर लाँच केलं आहे. यानंतर आयपीएलनं देखील मोठा निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली : भारतानं पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा बदला ऑपरेशन सिंदूर राबवून घेतला आहे. ऑपरेशन सिंदूर द्वारे पाकिस्तान आणि पाकव्याप्त जम्मू काश्मीरमधील 9 दहशतवादी ठिकाणांवर एअर स्ट्राइक केले. यात जवळपास 100 दहशतवाद्यांचा मृत्यू झाला. दुसरीकडे भारतानं पाकिस्तानची लाहोर येथील एअर डिफेन्स सिस्टीम उद्धवस्त केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी काल पाकिस्तान आणि नेपाळच्या सीमेला लागून असलेल्या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेचा भाग म्हणून काही विमानतळं बंद करण्यात आली आहेत तर काही फ्लाईट रद्द करण्यात आलेल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आयपीएलनं मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील मॅच धर्मशाला येथून हलवण्याचा निर्णय घेतला आहे. आता पंजाब आणि मुंबई यांच्यातील मॅच गुजरातच्या नरेंद्र क्रिकेट स्टेडियममध्ये होईल.
गुजरात क्रिकेट असोसिएशनचे सचिव अनिल पटेल यांनी मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्ज यांच्यातील मॅच नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियम अहमदाबाद येथे होणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. धर्मशाला जवळची विमानतळं बंद करण्यात आल्यानं मुंबई इंडियन्सला धर्मशाला येथे पोहोचणं शक्य नसल्याचं समोर आलं. त्यामुळं हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई इंडियन्सची टीम मुंबईतून धर्मशालासाठी बुधवारी सायंकाळी निघणं अपेक्षित होतं मात्र, विमानतळ बंद असल्यानं त्यांना मुंबईत थांबावं लागलं. मुंबई आणि पंजाब किंग्ज यांच्यातील सामन्या संदर्भातील प्रश्न सुटला आहे. मात्र, पंजाब किंग्ज आणि दिल्ली कॅपिटल्स या लढतीचं काय होणार हे पाहावं लागेल. ही मॅच आज धर्मशाला येथे होणार आहे. या मॅचनंतर दोन्ही संघांच्या पुढच्या लढती 11 मे रोजी आहेत. त्यामुळं त्यांना रस्ते मार्गाचा वापर करावा लागू शकतो. दोन्ही संघांचे खेळाडू मॅच संपल्यानंतर धर्मशाला सोडू शकतात. धर्मशाला पासून 2 तासाच्या अंतरावर रेल्वे स्टेशन असून खेळाडूंना काही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाऊ शकते.
मुंबईसाठी राहिलेल्या दोन लढतीत विजय आवश्यक
मुंबई इंडियन्सनं 12 सामन्यांमध्ये 7 विजयांसह 14 गुण मिळवलेले आहेत. हार्दिक पांड्याच्या नेतृत्त्वात मुंबई इंडियन्सला आयपीएलच्या प्लेऑफमध्ये प्रवेश करायचा असल्यास मोठ्या फरकानं दोन्ही मॅचेस जिंकाव्या लागणार आहेत. मुंबई इंडियन्स समोर दिल्ली कॅपिटल्सचं तगडं आव्हान राहू शकतं. पंजाब, दिल्ली आणि मुंबई या तीन संघांपैकी कोणते दोन संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करतात ते पाहावं लागेल. गुजरात आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांचा प्लेऑफचा प्रवेश निश्चित मानला जात आहे.





















