KKR vs LSG : सॉल्टची वादळी खेळी, स्टार्कचा भेदक मारा, केकेआरकडून लखनौचा दारुण पराभव
KKR vs LSG Match Report : कोलकात्यानं आठ विकेट आणि 26 चेंडू राखून लखनौचा दारुण पराभव केला. लखनौनं प्रथम फलंदाजी करताना 161 धावांपर्यंत मजल मारली होती.
KKR vs LSG Match Report : कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलमध्ये पहिल्यांदाच लखनौचा पराभव केला. ईडन गार्डन मैदानात झालेल्या सामन्यात कोलकात्यानं लखनौचा सहज पराभव केला. श्रेयस अय्यरच्या नेतृत्वातील कोलकात्यानं आठ विकेट आणि 26 चेंडू राखून लखनौचा दारुण पराभव केला. लखनौनं प्रथम फलंदाजी करताना 161 धावांपर्यंत मजल मारली होती. प्रत्युत्तरदाखल श्रेयस अय्यरच्या कोलकाता संघाने 15.4 षटकांमध्ये दोन विकेटच्या मोबदल्यात धावांचा यशस्वी पाठलाग केला. कोलकात्याकडून फिलीप साल्ट यानं सर्वात जास्त धावा केल्या. फिलीप साल्ट यानं 47 चेंडूमध्ये 89 धावांची झंझावती खेळी केली. या खेळीमध्ये साल्ट यानं तीन खणखणीत षटकार आणि 14 चौकारांचा पाऊस पाडला.
फिलीप साल्टशिवाय कोलकात्याकडून कप्तान श्रेयस अय्यरनं यानं 38 चेंडूमध्ये 38 धावांची खेळी केली. या डावात अय्यरने सात चौकारांचा पाऊस पाडला. सुनिल नारायण आणि अंगकृष रघुवंशी लवकर तंबूत परतले होते, पण फिल साल्ट आणि श्रेयस अय्यर यांनी लखनौच्या भेदक माऱ्याचा सामना करत कोलकात्याला सहज विजय मिळवून दिला. लखनौकडून मोहसिन खान सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मोहसिन खान यानं 4 षटकांत 29 धावांच्या मोबदल्यात दोन फलंदाजांना तंबूत धाडलं. मोहसिन खानचा अपवाद वगळता एकाही गोलंदाजाला भेदक मारा करता आला नाही.
लखनौकडून 161 धावांपर्यंत मजल
कोलकात्याचा कर्णधार श्रेयस अय्यर यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदीजीचा निर्णय घेतला. केएल राहुलच्या लखनौनं प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत सात विकेटच्या मोबदल्यात 161 धावांपर्यंत मजल मारली. लखनौच्या फलंदाजांनी ठराविक अंतरानं विकेट फेकल्या, त्यामुळे मोठी धावसंख्या उभारण्यात अपय़श आले. निकोलस पूरन यानं अखेरीस फटकेबाजी केल्यामुळे लखनौचा संघ 161 धावांपर्यंत पोहचला. लखनौसाठी निकोलस पूरन यानं 32 चेंडूमध्ये 45 धावांची खेळी केली. केएल राहुल यानं 27 चेंडूमध्ये 39 धावा जोडल्या. इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही.
मिचेल स्टार्क चमकला -
कोलकात्याकडून मिचेल स्टार्क सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मिचेल स्टार्क यानं लखनौच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवलं. त्याशिवाय वैभव अरोरा, हर्षित राणा, वरूण चक्रवर्थी आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.
गुणतालिकेत किती झाला बदल ?
लखनौचा पराभव करत लखनौनं गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. कोलकात्याचा संघ दुसऱ्या स्थानावर पोहचला आहे. कोलकात्यानं पाच सामन्यात चार विजय मिळवले आहेत. संजू सॅमसनची राजस्थान रॉयल्स संघाने सहा सामन्यात दहा गुण मिळवले असून ते अव्वल स्थानावर विराजमान आहेत.