हेड-अभिषेकचा झंझावात, नारायण-वरुणची फिरकी, IPL फायनलआधी हे आकडे पाहाच
KKR vs SRH, IPL Final 2024 : आयपीएल 2024 चा महाअंतिम सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये होणार आहे. थोड्याच वेळात आयपीएल चषकासाठी दोन्ही संघ भिडतील.
Kolkata Knight Riders And Sunrisers Hyderabad IPL 2024 Final : आयपीएल 17 चं विजेतेपद कुणाला मिळणार? याचं उत्तर आज मिळणार आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यामध्ये आज खिताबी लढत होणार आहे. चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर श्रेयस अय्यर आणि पॅट कमिन्स यांच्या संघामध्ये आमनासामना होणार आहे. 2012 मध्ये याच मैदानावर कोलकाता नाईट रायडर्सने चषकावर नाव कोरले होते. यंदाच्या हंगामात कोलकाता नाईट रायडर्सने शानदार कामगिरी केली आहे, ते गुणतालिकात आघाडीवर आहेत. हैदराबादनेही शानदार कामगिरी केली. दोन्ही संघामध्ये तुल्यबळ लढत होईल, यात शंकाच नाही. पण दोन्ही संघातील खेळाडूंची कामगिरी शानदार राहिली आहे.
नटराजनच्या नावावर अखेरच्या षटकात 11 विकेट
टी नटराजन याला डेथ ओव्हर स्पेशालिस्ट म्हटले जाते. त्याने अखेरच्या षटकात आतापर्यंत 98 चेंडू फेकले आहेत, त्याच्या नावावर 11 विकेट आहेत. क्वालिफायर 2 मध्ये नटराजन याने 18 आणि 20 वे षटक फेकले होते. या दोन षटकात त्याने फक्त 6 धावा दिल्या होत्या. दिल्लीविरोधातील एका सामन्यात नटराजन याने 19 वे षटक निर्धाव फेकत तीन विकेट घेतल्या होत्या.
केकेआरची फलंदाजी शानदार -
कोलकाता नाईट रायडर्सने यंदा शानदार कामगिरी केली. त्यांच्या फलंदाजांनी खोऱ्याने धावा चोपल्या आहे. यंदाच्या हंगामात कोलकात्याच्या फलंदाजांची सरासरी सर्वात चांगली आहे. कोलकात्याने 34.5 च्या सरारीने धावा केल्या आहेत. त्याशिवाय कोलकात्याने 10.7 च्या रनरेटने धावा चोपल्या आहेत. सरासरी आणि रनरेटमध्ये कोलकाता एक नंबरवर आहे. कोलकात्याच्या फलंदाजांना रोखणं, प्रतिस्पर्धींसाठी मोठं आव्हान असेल.
वरुण आणि नारायणच्या नावावर 36 विकेट -
सुनिल नारायण यानं फलंदाजीसोबत गोलंदाजीतही धमाल केली आहे. नारायण आणि वरुण चक्रवर्ती यांच्या जाळ्यात दिग्गज अडकलेत. दोघांनी आतापर्यंत 36 विकेट घेतल्या आहेत. वरुण चक्रवर्तीने 20 तर नारायण याने 16 विकेट घेतल्या आहेत. चेपॉकची खेळपट्टी या दोन्ही गोलंदाजांसाठी पोषकच आहे. त्यामुळे हैदराबादसमोर या दोन्ही गोलंदाजांचा सामना कऱण्याचं मोठं आव्हान असेल.
हैदराबादच्या नावावर सर्वाधिक षटकार -
आयपीएल 2024 मध्ये षटकारांचा पाऊस पडलाय. त्यामध्ये हैदराबादचा वाटा सर्वाधिक आहे. सनरायजर्स हैदराबादने यंदाच्या हंगामात 175 षटकार ठोकले आहेत. कोणत्याही हंगामात एखाद्या संघाने इतके षटकार मारलेले नाहीत. अभिषेक शर्मा, ट्रेविस हेड, क्लासेन आणि नितीश रेड्डी यांनी षटकारांचा पाऊस पाडलाय.
हेड -अभिषेकचे वादळ -
ट्रेविस हेड आणि अभिषेक शर्मा हे पहिल्या चेंडूपासूनच आक्रमक फलंदाजी करताता. या दोघांसमोर प्रतिस्पर्धी गोलंदाजांना धडकी भरते. दोघांनी आतापर्यंत 689 धावा जोडल्या आहेत. या दोघांचा स्ट्राईक रेट 227 इचका राहिलाय. लखनौविरोधात या दोघांनी 10 षटकांमध्ये 165 धावांच्या यशस्वी पाठलाग केला होता. हेड आणि अभिषेक शर्मा यांना रोखणं कोलकात्यासमोर मोठं आव्हान असेल.