अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक, हेनरिक क्लासेनची फटकेबाजी, हैदराबादचा पंजाबवर 4 विकेट्सने विजय
IPL 2024 SRH vs PBKS LIVE Score: अखेरच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्सचा चार विकेटने पराभव केला.
IPL 2024 SRH vs PBKS LIVE Score: अखेरच्या साखळी सामन्यात सनरायजर्स हैदराबादने पंजाब किंग्सचा चार विकेटने पराभव केला. पंजाबने दिलेले 215 धावांचे आव्हान हैदराबादने सहा विकेटच्या मोबदल्यात सहज पार केले. हैदराबादने या विजयासह दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे. कोलकात्याविरोधात राजस्थानचा पराभव झाल्यास हैदराबाद संघ गुणतालिकेत दुसऱ्या क्रमांकावर कायम राहणार आहे. पंजाबविरोधात अभिषेक शर्माने अर्धशतक ठोकले. त्याशिवाय राहुल त्रिपाठी, हेनरिक क्लासेन आणि नितीश रेड्डी यांनी महत्वाचं योगदान दिले. पंजाबकडून हर्षल पटेल आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. पंजाबचा आयपीएल 2024 हंगामाचा शेवट पराभवाने झाले. पंजाब किंग्सला 14 सामन्यात फक्त 10 गुणांची कमाई करता आली. पंजाबला पाच सामने जिंकता आले, तर नऊ सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला.
हैदराबादची खराब सुरुवात, पण त्रिपाठीने डाव सावरला -
पंजाबने दिलेल्या 215 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबादची सुरुवात अतिशय़ खराब झाली. अर्शदीप सिंह याने पहिल्याच चेंडूवर विस्फोटक ट्रेविस हेड याला तंबूत पाठवले. पण त्यानंतर अभिषेक शर्मा आणि अभिषेक त्रिपाठी यांनी पंजाबच्या गोलंदाजांचा समाचार घेतला. दोघांनी चौफेर फटकेबाजी केली. 29 चेंडूमध्ये दुसऱ्या विकेटसाठी 72 धावांची भागिदारी केली. हर्षल पटेलने राहुल त्रिपाठीला बाद करत ही जोडी फोडली. राहुल त्रिपाठीने 184 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. त्याने 18 चेंडूत 33 धावांचा पाऊस पाडला. या खेळीत त्याने 2 षटकार आणि चार षटकार ठोकले.
अभिषेक शर्माचे वादळी अर्धशतक -
एका बाजूला विकेट पडत असताना अभिषेक शर्माने दुसऱ्या बाजूने फटकेबाजी सुरुच ठेवली. अभिषेक शर्माने चौफेर फटकेबाजी करत पंजाबची गोलंदाजी फोडली. अभिषेकच्या फटकेबाजीसमोर पंजाबच्या गोलंदाजांची दाणदाण उडाली. अभिषेक शर्माने 236 च्या स्ट्राईक रेटने फटकेबाजी केली. त्याने 28 चेंडूमध्ये 66 धावांचा पाऊस पाडला. या खेळीमध्ये त्याने सहा षटकार आणि पाच चौकार ठोकले.
रेड्डीची फटकेबाजी -
अभिषेक शर्मा तंबूत परतल्यानंतर नितीश रेड्डी आणि हेनरिक क्लासेन यांनी फटकेबाजी सुरुच ठेवली. रेड्डी याने 25 चेंडूत 37 धावांची छोटेखानी खेळी केली. रेड्डी याने आपल्या खेलीमध्ये तीन षटकार आणि एक चौकार ठोकले. रेड्डी आणि क्लासेन ही जोडी हर्षल पटेल याने फोडली. पण तोपर्यंत वेळ निघून गेला होता. रेड्डी तंबूत परतल्यानंतर शाहबाज अहमदही बाद झाला. अहमद फक्त तीन धावा काढून बाद झाला.
क्लासेनचे वादळ -
लागोपाठ दोन विकेट पडल्यानंतर हेनरिक क्लासेन याने सामन्याची सुत्रे हातात घेतली. क्लासेन याने अब्दुल समदच्या साथीने हैदराबादला विजय मिळवून दिला. दोघांनी चौफेर फटकेबाजी करत विजय आवाक्यात आणला. पण हेनरिक क्लासेन चुकीचा फटका मारुन बाद झाला. हेनरिक क्लासेन याने 26 चेंडूमध्ये 42 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये क्लासेन याने दोन षटकार आणि तीन चौकार ठोकले. अब्दुल समद आणि सनवीर यांनी अखेर विजयावर शिक्कामोर्तब केले. अब्दुल समद 11 तर सनवीर 6 धावांवर नाबाद राहिले.
पंजाबची गोलंदाजी कशी राहिली -
पंजाबकडून अर्शदीप सिंह आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. शशांक सिंह आणि हरप्रीत ब्रार यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली..