Rishabh Pant : चांगली सुरुवात करुनही अपयश,रिषभ पंत प्रचंड संतापला, आऊट होताच जे केलं ते धक्कादायक
Rishabh Pant : आयपीएलच्या 17 व्या पर्वात दुखापतीनंतर कमबॅक करणाऱ्या रिषभ पंतला काल बाद झाल्यानंतर राग अनावर झाल्याचं दिसून आलं. रागाच्या भरात त्यानं बॅट भितींवर आदळली.
जयपूर : आयपीएलमधील (IPL 2024) नववी मॅच राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals ) आणि दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) यांच्यात जयपूर येथे पार पडली. या मॅचमध्ये राजस्थान रॉयल्सनं दिल्ली कॅपिटल्सला पराभूत केलं. दिल्ली कॅपिटल्सनं टॉस जिंकून प्रथम राजस्थानला बॅटिंगसाठी आमंत्रित केलं होतं. राजस्थाननं रियान परागच्या (Riyan Parag) आक्रमक फलंदाजीच्या जोरावर 5 विकेटवर 185 धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना दिल्ली कॅपिटल्सचे सलामीवीर मिशेल मार्श आणि डेव्हिड वॉर्नरनं चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र, ते दोघे बाद झाल्यानंतर दिल्लीच्या विकेट पडत गेल्या आणि त्यांना सलग दुसऱ्या मॅचमध्ये पराभव स्वीकारावा लागला. रिषभ पंतला दुसऱ्या मॅचमध्येही चांगली धावसंख्या करण्यात अपयश आलं. रिषभ पंत (Rishabh Pant) बाद झाल्यानंतर पॅव्हेलियनमध्ये जाताना प्रचंड संतापलेला दिसत होता. त्यानं स्टेडियमबाहेर गेल्यानंतर काय केलं त्याचा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
रिषभ पंतनं टॉस जिंकून प्रथम राजस्थानला बॅटिंगला आमंत्रित केलं होतं. राजस्थानची सुरुवात खराब झाली होती. मात्र, रियान परागच्या 45 बॉलमधील 84 धावांच्या खेळीनं राजस्थानची टीम 5 विकेटवर 185 धावा करु शकली. रियान परागनं 7 फोर आणि 6 सिक्स मारले. दिल्ली कॅपिटल्सनं 185 धावांचा पाठलाग करताना चांगली सुरुवात केली होती. दिल्ली कॅपिटल्सला 20 ओव्हरमध्ये 5 विकेटवर 173 धावा करता आल्या. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर 49, ट्रिस्टन स्टब्स 44 आणि रिषभ पंतनं 28 धावा केल्या.
रिषभ पंतला मोठी धावसंख्या उभारण्यात अपयश
रिषभ पंतनं दुसऱ्या मॅचमध्ये देखील चांगली फलंदाजी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याची खेळी टीमला विजयापर्यंत नेऊ शकली नाही. रिषभ पंतनं 26 बॉलमध्ये 28 धावा केल्या. यामध्ये त्यानं 1 सिक्स आणि 4 फोर मारले. रिषभ पंत मोठी धावसंख्या उभारु शकेल असं वाटत असतानाच त्याला यजुवेंद्र चहल यानं बाद केलं. यानंतर रिषभ पंत स्वत:वर खूप संतापलेला दिसून आला. रिषभ पंतनं मैदानाबाहेर गेल्यानंतर बाजूच्या भिंतीवर बॅट जोरात मारली. रिषभ पंतचा हा व्हिडीओ आता व्हायरल होत आहे.
रिषभ पंतचा व्हिडीओ
— IndiaCricket (@IndiaCrick18158) March 28, 2024
दिल्लीला पहिला विजय कधी ?
दिल्ली कॅपिटल्सला पहिल्या मॅचमध्ये पंजाब किंग्जकडून पराभव स्वीकारावा लागला होता. तर, दुसऱ्या मॅचमध्ये राजस्थानकडून त्यांनी 12 धावांनी पराभव स्वीकारला. दिल्ली कॅपिटल्सचं नेतृत्त्व रिषभ पंत करतोय. रिषभच्या जोडीला डेव्हिड वॉर्नर, मिशेल मार्श असे तगडे खेळाडू आहेत. आता यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला विजय मिळण्यासाठी दिल्लीला चेन्नई विरुद्धच्या लढतीची वाट पाहावी लागेल. दिल्ली आणि चेन्नई यांच्यातील मॅच 31 मार्चला होणार आहे.
संबंधित बातम्या :
Kavya Maran: कोण आहे काव्या मारन, संपत्ती किती?; सनरायझर्स हैदराबादच्या विजयानंतर पुन्हा आली चर्चेत