Rajasthan Royals Vs Delhi Capitals: 6 चेंडूत 17 धावा, आवेश खानचा टिच्चून मारा; राजस्थानचा 12 धावांनी विजय, दिल्लीचा सलग दुसरा पराभव
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: राजस्थानचा हा सलग दुसरा विजय आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा सलग दुसरा पराभव आहे.
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: आयपीएल 2024 च्या 9व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने (RR) दिल्ली कॅपिटल्सचा (DC) 12 धावांनी पराभव केला. राजस्थानसाठी प्रथम रियान परागने 84 धावांची नाबाद खेळी केली आणि त्यानंतर गोलंदाजांनी आपले काम चोख बजावत शानदार विजय मिळवला.
Match 9. Rajasthan Royals Won by 12 Run(s) https://t.co/gSsTvJfhY3 #TATAIPL #IPL2024 #RRvDC
— IndianPremierLeague (@IPL) March 28, 2024
राजस्थानचा हा सलग दुसरा विजय आहे, तर दिल्ली कॅपिटल्सचा सलग दुसरा पराभव आहे. दिल्लीला शेवटच्या षटकात विजयासाठी 17 धावांची आवश्यकता होती. पण आवेश खानने अप्रतिम गोलंदाजी करत आपल्या संघाला विजय मिळवून दिला. दिल्लीसाठी ट्रस्टन स्टब्सने 23 चेंडूंत 2 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 44 धावा केल्या, मात्र तो आपल्या संघाला विजयापर्यंत नेऊ शकला नाही.
दिल्लीला विजयासाठी 6 चेंडूत हव्या होत्या 17 धावा-
दिल्लीला विजयासाठी 6 चेंडूत 17 धावांची गरज होती. 20 वे षटक आवेश खानने टाकले. या षटकांत आवेशने फक्त 4 धावा दिल्या. आवेशच्या अचूक टप्प्याच्या गोलंदाजीवर दिल्लीच्या फलंदाजांना अपयश आले आणि राजस्थानने 12 धावांनी विजय मिळवला. राजस्थानचा हा सलग दुसरा विजय आहे. तर दिल्लीचा यंदाच्या हंगामातील सलग दुसरा पराभव आहे.
वॉर्नरचे अर्धशतक हुकले; 49 धावा करत माघारी
डेव्हिड वॉर्नरचे अर्धशतक अवघ्या एका धावेने हुकले. 12व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर आवेश खानने त्याला झेलबाद केले. वॉर्नरने पाच चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने 49 धावा केल्या.
राजस्थानने झळकावल्या 185 धावा
राजस्थान रॉयल्सने प्रथम खेळताना 185 धावा केल्या. यशस्वी जैस्वाल पहिल्याच चेंडूपासून अडचणीत दिसली आणि केवळ 5 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. जॉस बटलरची बॅट सलग दुसऱ्या सामन्यात शांत राहिली, त्याने केवळ 11 धावा केल्या. कर्णधार संजू सॅमसनने सुरुवात चांगली केली, पण 14 चेंडूत केवळ 15 धावा करून तो बाद झाला. रविचंद्रन अश्विन आणि रियान पराग यांच्यातील 54 धावांच्या भागीदारीने राजस्थान संघाला सावरले. 15 षटकांनंतर संघाची धावसंख्या 108 धावा होती, मात्र शेवटच्या 5 षटकांत रियान परागने दिल्लीच्या गोलंदाजांची चांगलीच कोंडी केली. राजस्थान रॉयल्सने शेवटच्या 5 षटकात एकूण 77 धावा केल्या आहेत. त्याच्यासोबत शिमरॉन हेटमायरनेही 7 चेंडूत चौकार आणि षटकारांसह 14 धावांची खेळी केली. शेवटच्या षटकात ॲनरिक नॉर्टजेने 25 धावा दिल्या. त्यामुळे संघाची धावसंख्या 185 पर्यंत पोहोचली.
संबंधित बातम्या:
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं