IPL 2024 : धोनी, रोहित अन् विराटसह पाच जण खेळलेत प्रत्येक आयपीएल हंगाम
IPL 2024 : आतापर्यंत झालेल्या 16 हंगामात खेळणारे दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आहेत, पण पाच खेळाडू यंदाच्या हंगामातही खेळताना दिसणार आहेत.
List Of Players Who Featured Since IPL 2008 : आयपीएल 2024 ला शुक्रवारपासून दणक्यात सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या 17 व्या हंगामाची सुरुवात धोनीच्या (MS Dhoni) सीएसके आणि विराट कोहलीच्या (Virat Kohli) आरसीबीमधील (CSK vs RCB, IPL 2024) लढतीने होणार आहे. आयपीएलच्या रनसंग्रामाला 2008 मध्ये सुरुवात झाली होती, आताचा हा 17 वा हंगाम आहे. आतापर्यंत झालेल्या 16 हंगामात खेळणारे दिग्गज खेळाडू निवृत्त झाले आहेत, पण पाच खेळाडू यंदाच्या हंगामातही खेळताना दिसणार आहेत. आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून आतापर्यंत या पाच खेळाडूंनी अनेक विक्रम केले आहेत. यामधील दोन खेळाडूंनी कर्णधार असताना प्रत्येकी पाच पाच चषकावर नाव कोरलेय. एमएस धोनी, रोहित शर्मा, विराट कोहली, दिनेश कार्तिक आणि शिखर धवन यांचा यंदाचा 17 वा आयपीएल हंगाम असेल. या पाच खेळाडूंनी प्रत्येक हंगामात कमीतकमी एकतरी सामना खेळला आहे.
एमएस धोनी -
कॅप्टन कूल एमएस धोनी आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून चेन्नईचा सदस्य राहिलाय. धोनीनं पहिल्या हंगामात चेन्नईचं नेतृत्व केले होते. त्यावेळी चेन्नईचा संघाने फायनलमध्ये धडक मारली होती, शेन वॉर्नच्या राजस्थानकडून त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. 2008 पासून धोनी चेन्नईच्या संघाचा सदस्य राहिलाय. दरम्यान, चेन्नईचा संघ आयपीएलमध्ये बॅन झाला, तेव्हा दोन हंगाम धोनी पुणे संघाला सदस्य राहिलाय. धोनीच्या नेतृत्वात चेन्नईने आतापर्यंत पाच वेळा आयपीएल चषकावर नाव कोरलेय. आयपीएलच्या 16 वर्षातील सर्वात यशस्वी कर्णधारामध्ये धोनीचं नाव आहे. धोनीने चेन्नईला 14 वेळा प्लेऑफमध्ये नेले आहे. यंदाही धोनीच्या चेन्नई जेतेपदाचा दावेदार म्हटलं जातेय.
विराट कोहली -
विराट कोहलीला आरसीबीने 2008 मध्ये फक्त 12 लाख रुपयांमध्ये खरेदी केले होते. तेव्हापासून विराट कोहली आरसीबीचा सदस्य आहे. एकाच संघाकडून 17 वर्षे खेळण्याचा विक्रम विराट कोहलीच्या नावावर आहे. विराट कोहलीशिवाय इतर एकाही फलंदाजाने एकाच संघाकडून 17 वर्षे आयपीएल सामने खेळले नाहीत. विराट कोहलीने आरसीबीसाठी आतापर्यंत 137 सामने खेळले आहे. त्यामध्ये 130 च्या स्ट्राईकरेटने 7263 धावांचा पाऊस पाडलाय. यामध्ये सात शतकांचा समावेश आहे. आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा काढणाऱ्या फलंदाजामध्ये विराट कोहली अव्वल स्थानावर विराजमान आहे.
दिनेश कार्तिक
2008 पासून दिनेश कार्तिक प्रत्येक आयपीएल हंगामात खेळला आहे. 2008 मध्ये दिनेश कार्तिक पंजाब संघाचा सदस्य राहिलाय. मागील 16 वर्ष दिनेश कार्तिक वेगवेगळ्या संघाकडून आयपीएल खेळला आहे. दिनेश कार्तिकने आयपीएलमध्ये 242 सामने खेळले आहेत. यामध्ये 4516 धावा चोपल्या आहेत. दिनेश कार्तिक यंदा आरसीबीच्या ताफ्यात आहे. त्याआधी दिनेश कार्तिक पंजाब, दिल्ली, मुंबई इंडियन्स, कोलकाता नाइट रायडर्स संघाचाही सदस्य राहिलाय.
शिखर धवन -
आयपीएलच्या पहिल्या हंगामात शिखर धवन मुंबई इंडियन्सच्या संघाचा सदस्य होता. त्यानंतर तो दिल्लीच्या ताफ्यात गेला. धवन हैदराबाद संघाकडूनही खेळला आहे. शिखर धवन सध्या पंजाब संघाचा कर्णधार आहे. शिखर धवन यानं आयपीएलमध्ये खोऱ्याने धावा चोपल्या आहेत. शिखर दवन याने आतापर्यंत 217 आयपीएल सामन्यात 127 च्या स्ट्राईक रेटने 6616 धावांचा पाऊस पाडलाय. त्याने आयपीएलमध्ये दोन शतकेही ठोकली आहेत.
रोहित शर्मा -
रोहित शर्मानं 2008 मध्ये आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. डेक्कन चार्सर्स हैदराबाद संघाकडून रोहित शर्माने आयपीएलमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर 2011 मध्ये मुंबई इंडियन्सने त्याला खरेदी केले. 2013 मध्ये रोहित शर्माने मुंबई इंडियन्सची धुरा संभाळली होती. रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबईने आयपीएलच्या पाच जेतेपदावर नाव कोरलेय. रोहित शर्माने 243 आयपीएल सामन्यात 130 च्या स्ट्राईक रेटने 6211 धावा चोपल्या आहेत. यंदा रोहित शर्मा मुंबई इंडियन्सकडून खेळाडू म्हणून खेळणार आहे.