Shubman Gill : बीसीसीआयनं वनडे संघाच्या कर्णधार पदाची जबाबदारी सोपवली, शुभमन गिल पहिली प्रतिक्रिया देत म्हणाला, आमचं अंतिम ध्येय...
Shubman Gill : आस्ट्रेलिया दौऱ्यासाठी बीसीसीआयच्या निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी भारतीय संघ जाहीर केले. वनडेमध्ये शुभमन गिल तर टी 20 मध्ये सूर्यकुमार यादव कर्णधार असेल.

अहमदाबाद : भारताचा संघ तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका आणि 5 टी 20 सामन्यांच्या मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यासाठी निवड समितीचे प्रमुख अजित आगरकर यांनी संघ जाहीर केला. या दौऱ्याच्या संघ निवडीच्या निमित्तानं बीसीसीआय 2027 चा वनडे वर्ल्ड कप डोळ्यासमोर ठेवत शुभमन गिलला कर्णधार पद सोपवलं.
Shubman Gill Reaction afer ODI Captain : शुभमन गिलची पहिली प्रतिक्रिया
शुभमन गिलच्या नेतृत्त्वात आता रोहित शर्मा आणि विराट कोहली खेळणार आहेत. इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेपूर्वी रोहित शर्मा आणि विराट कोहलीनं कसोटीतू निवृत्ती घेतली होती. तेव्हा शुभमन गिलला कसोटीत कर्णधारपद सोपवलं गेलं होतं. शुभमन गिलच्या टीम इंडियानं इंग्लंड विरुद्धची कसोटी मालिका 2-2 अशा बरोबरीत सोडवली होती.
आता ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील वनडे मालिकेच्या निमित्तानं शुभमन गिलकडे कर्णधार पद देण्यात आलं आहे. बीसीसीआयच्या या निर्णयावर शुभमन गिलनं प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणाला,तुमच्या देशाचं नेतृत्व वनडे मध्ये करायला मिळणं हा मोठा बहुमान आहे. ज्या टीमनं खूप चांगली कामगिरी केलीय त्यांचं नेतृत्व करणं हे अभिमानास्पद आहे. मी देखील चांगली करेन अशी आशा आहे, असं शुभमन गिल म्हणाला.
मला वाटतं वनडे वर्ल्ड कप पूर्वी 20 वनडे खेळायच्या आहेत. आमचं ध्येय दक्षिण आफ्रिकेत होणारा वर्ल्ड कप आहे. आम्ही आता जे खेळतोय ते सर्व, प्रत्येक खेळाडू जे प्रयत्न करतोय, त्यातून याचा विश्वास आहे आम्ही वर्ल्ड कप जिंकण्यासाठी पूर्णपणे तयार आहे.
वनडे आणि कसोटीत नेतृत्त्व, टी 20 त उपकर्णधार
शुभमन गिलकडे भारताच्या कसोटी संघाचं नेतृत्त्व 24 मे 2025 रोजी सोपवण्यात आलं होतं. त्यानंतर इंग्लंड दौऱ्यात गिलनं त्याच्या नेतृत्वाची छाप दाखवली होती. आता 4 ऑक्टोबरला शुभमन गिलला वनडे संघाचा कर्णधार करण्यात आलं आहे. तर, टी 20 टीमचा शुभमन गिल उपकर्णधार आहे. सध्या टी-20 संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव आहे.
दरम्यान, शुभमन गिल आयपीएलमध्ये गुजरात टायटन्सचा कॅप्टन आहे. मधल्या काळात भारताच्या झिम्बॉब्वेच्या दौऱ्यावर त्यानं टी 20 संघाचं नेतृत्त्व केलं होतं.
वनडेसाठी भारताचा संघ
शुभमन गिल- कर्णधार, श्रेयस अय्यर- उपकर्णधार, विराट कोहली, रोहित शर्मा, अक्षर पटेल, के.एल. राहुल नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर कुलदीप यादव, हर्षित राणा, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, प्रसिद्ध कृष्णा, ध्रुव जुरेल, यशस्वी जैस्वाल.
वनडे मालिकेचं वेळापत्रक
19 ऑक्टोबर - पहिली वनडे (पर्थ)
23 ऑक्टोबर- दुसरी वनडे (एडिलेड)
25 ऑक्टोबर- तिसरी वनडे (सिडनी)
















