Arvind Kejriwal : पंजाबमधून राज्यसभेत जायचं की नाही? अरविंद केजरीवालांचं ठरलं, आम आदमीचा उमेदवार निश्चित
Arvind Kejriwal : अरविंद केजरीवाल यांचा दिल्ली विधानसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते राज्यसभेत जातील अशा चर्चा सुरु होत्या.

नवी दिल्ली : आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल पंजाबमधील एका रिक्त जागेवरुन राज्यसभेत जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. या चर्चांवर अखेर उत्तर मिळालं आहे. आम आदमी पार्टीनं राज्यसभेच्या एका जागेसाठी उमेदवार निश्चित केला आहे. अरविंद केजरीवाल राज्यसभेवर जाणार नाहीत. आम आदमी पार्टीनं राज्यसभा निवडणुकीसाठी ट्रायडंट ग्रुपचे मालक उद्योजक राजेंद्र गुप्ता यांना उमेदवारी जाहीर होणार. आम आदमी पार्टीनं 2022 मध्ये गुप्ता यांना पंजाब नियोजन मंडळात सहभागी करुन घेतलं होतं. राजेंद्र गुप्ता यांनी तिथून राजीनामा दिला आहे.
Arvind Kejriwal Decision on Rajya Sabha : राज्यसभेबाबत अरविंद केजरीवालांचं ठरलं
आपचे राज्यसभा खासदार संजीव अरोडा लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जिंकले होते. त्यामुळं त्यांनी राज्यसभा खासदार पदाचा राजीनामा दिला होता. संजीव अरोरा यांना विधानसभा पोटनिवडणुकीत उमेदवार जाहीर केल्यानंतर अरविंद केजरीवाल राज्यसभेत जाणार असल्याची चर्चा होती. पंजाबमधील विरोधी पक्षांनी केजरीवाल राज्यसभेत जाणार असल्याचे दावे केले होते. त्यानंतर केजरीवाल यांनी त्या चर्चा फेटाळल्या होत्या आणि राज्यसभेत जाणार नाही, असं म्हटलं होतं.
संजीव अरोरा पोटनिवडणुकीत विजयी
लुधियाना पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीत आपनं राज्यसभेचे तत्कालीन खासदार संजीव अरोरा यांना उमेदवारी दिली होती. त्यांनी काँग्रेसचे उमेदवार भारत भूषण आशू यांना पराभूत केलं होतं. भाजपचे जीवन गुप्ता तिसऱ्या स्थानावर राहिले होते. पोटनिवडणुकीत संजीव अरोरा यांना 35179 मतं मिळाली होती. तर, काँग्रेसच्या आशू यांना 24525 मतं मिळाली. पोटनिवडणूक जिंकल्यानंतर संजीव अरोरा यांनी राज्यसभेचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांना पंजाब सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री करण्यात आले.
पंजाबमध्ये राज्यसभेच्या सात जागा
पंजाबमध्ये राज्यसभेच्या सात जागा आहेत. त्यापैकी एक जागा रिक्त आहे. सहा जागांवर आपचे खासदार आहेत. राघव चड्डा, अशोक कुमार मित्तल, संदीप पाठक, विक्रमजीत सिंह साहनी, हरभजन सिंह आणि संत बलबीर सिंह हे आपचे राज्यसभा खासदार पंजाबमधून आहेत.

























