गुजरातचा TN फॅक्टर मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडचं टेन्शन वाढवणार? शुभमन गिलला नेमका कशाचा फायदा?
GT vs CSK : आयपीएलमधील सातवी मॅच आज चेन्नईच्या चेपॉकवर होणार आहे. ऋतुराज गायकवाड आणि शुभमन गिल यांच्या नेतृत्त्वाचा आज कस लागणार आहे.
चेन्नई :गुजरात टायटन्स (Gujarat Titans)आणि चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात आयपीएलची सातवी मॅच आज होणार आहे. ही मॅच चेन्नईतील चेपॉकवर होणार आहे. चेन्नई सुपर किंग्जसाठी होम ग्राऊंडवर मॅच होणार असल्यानं अधिक काळजी करण्याची गरज नाही, असं वाटू शकतं मात्र तसं नाही. गुजरात टायटन्सच्या संघात तामिळनाडूचे खेळाडू असल्यानं चेन्नईचा कॅप्टन ऋतुराज गायकवाडचं देखील टेन्शन वाढू शकतं.
गुजरात टायटन्समध्ये तामिळनाडूचे किती खेळाडू?
गुजरात टायटन्समध्ये तामिळनाडूचे पाच खेळाडू आहेत. या खेळाडूंना चेपॉकच्या खेळपट्टीची चांगली माहिती आहे. तामिळनाडूतील वातावरणात क्रिकेट खेळणाऱ्या या खेळाडूंचा गुजरातला चांगला फायदा होण्याची शक्यता आहे.
विशेष बाब म्हणजे गुजरात टायटन्सच्या संघात तामिळनाडूचे पाच खेळाडू आहेत. तामिळनाडूची एकमेव फ्रँचायजी असलेल्या चेन्नई सुपर किंग्जमध्ये मात्र एकाही स्थानिक खेळाडूचा समावेश नाही.
गुजरात टायटन्सनं मुंबईवर विजय मिळवल्यानंतर पुढील मॅचसाठी टीम चेन्नईमध्ये दाखल झाली आहे. बी.साई सुदर्शन, विजय शंकर, आर. साई किशोर यांचा संघात समावेश असेल. तर, शारुख खान आणि संदीप वॉरिअर यांना संघात स्थान मिळते का हे पाहावं लागेल. साई सुदर्शननं मुंबई इंडियन्स विरोधात चांगली फंलदाजी केली होती. तर, साई किशोर यानं रोहित शर्माची महत्त्वाची विकेट घेतल्यानंतर मुंबई इंडियन्सला गळती लागली होती.
चेन्नईचे कोच स्टीफन फ्लेमिंग यांनी देखील तामिळनाडूच्या खेळाडूंच्या कामगिरीचा गुजरात टायटन्सला फायदा होऊ शकतं असं म्हटलं आहे. काही खेळाडूंसाठी होमग्राऊंडवर खेळत असल्यासारखी स्थिती असेल. गुजरातकडे तामिळनाडूतील खेळाडू असतील पण चेन्नईच्या टीमनं देखील चेपॉकवर विरोधी टीम्सना पराभवाची धूळ चारली आहे.
आयपीएलच्या उद्घाटनाच्या लढतीत चेन्नई सुपर किंग्जनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला पराभूत केलं होतं. ऋतुराज गायकवाडचं नेतृत्व, एम . एस. धोनी, रवींद्र जडेजा सारखे दिग्गज खेळाडू आणि राचीन रवींद्र मुस्तफिजूर रहमान आणि डिवोन कॉन्वे या खेळाडूंमुळं चेन्नईची टीम देखील तगडी आहे.
गुजरातला 2023 च्या आयपीएल फायनलचा बदला घेण्याची संधी
चेन्नई सुपर किंग्जनं 2023 च्या 16 व्या आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सला पराभूत केलं होतं. 2022 च्या आयपीएलमध्ये विजेतेपद पटकावणाऱ्या गुजरातनं 2023 च्या आयपीएलमध्ये फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वातील चेन्नई सुपर किंग्जनं गुजरातला पराभूत केलं होतं. गेल्या निवडणुकीतील पराभवाचा बदला गुजरात टायटन्स घेणार का हे पाहावं लागणार आहे.
संबंधित बातम्या :
IPL 2024 : आरसीबीचा पहिला विजय, पॉइंट टेबलमध्ये उलटफेर, टॉपला कोणती टीम, ऑरेंज कॅप कुणाकडे?