(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL 2022: युजवेंद्र चहलनं सांगितला आयपीएलमधील भयानक किस्सा; दारूच्या नशेत एका क्रिकेटरनं त्याच्यासोबत...
राजस्थानचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलनं आयपीएलमधील एक मोठा खुलासा केलाय. राजस्थान रॉयल्सनं ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये चहलनं आयपीएल 2013 मध्ये त्याच्यासोबत घडलेला भयानक किस्सा सांगितला आहे.
IPL 2022: राजस्थानचा लेगस्पिनर युजवेंद्र चहलनं आयपीएलमधील एक मोठा खुलासा केलाय. राजस्थान रॉयल्सनं ट्विटरवर शेअर केलेल्या एका व्हिडिओमध्ये चहलनं आयपीएल 2013 मध्ये त्याच्यासोबत घडलेला भयानक किस्सा सांगितला आहे. दरम्यान, मुंबईच्या संघाकडून खेळत असताना त्याला एका खेळाडूनं दारूच्या नशेत पंधराव्या मजल्यावरील बाल्कनीत लटकवलं होतं. थोडक्यात त्याचा जीव वाचला, असं त्यानं या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. युजवेंद्र चहलसोबत नेमकं काय घडलं होतं? हे जाणून घेऊयात.
चहल म्हणाला की, "सामना संपल्यानंतर सर्व खेळाडूंना एकत्र येण्यासाठी बोलावण्यात आले. मला त्याचे नाव सांगायला आवडणार नाही, पण एका खेळाडूनं खूप दारू प्यायली होती. तो खूप नशेत होता. त्यानं बराच वेळ माझ्याकडे पाहिलं आणि मग मला हाक मारली. त्यानं मला बाहेर जाण्यास सांगितले आणि 15 व्या मजल्यावरच्या बाल्कनीत लटकवलं.त्यावेळी मी पूर्णपणे घाबरलो होतो. मी त्या खेळाडूला घट्ट पकडले. जर त्यावेळी माझा सटकला असता तर मी पंधराव्या मजल्यावरून खाली पडलो असतो. मात्र, काही वेळातच बाकीचे लोक बाल्कनीत आले आणि वर घेतलं. यानंतर मी बेशुद्ध झालो. इतर खेळाडूंनी मला पाणी दिल्यानंतर शुद्धीत आलो", असंही त्यानं सांगितलं आहे. तसेच त्यानं त्या दारूड्या खेळाडूचं नाव सांगण्यास टाळलं आहे.
पुढे चहल म्हणाला की, ही एक घटना आहे जी मी आजपर्यंत विसरलेलो नाही. चहल जेव्हा या घटनेबाबत सांगत होता, त्यावेळी त्याच्यासोबत अश्विन आणि करुण नायरही उपस्थित होते. 2013 मध्ये तो मुंबईकडून एकच सामना खेळला होता. 2014 मध्ये मुंबई सोडल्यानंतर चहलला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने खरेदी केले होतं. तेव्हापासून 2021 पर्यंत चहल बंगळुरूच्या संघाचा भाग होता. परंतु, आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील मेगा ऑक्शनपूर्वी बंगळुरूच्या संघानं त्याला रिलीज केलं. त्यानंतर राजस्थानच्या संघानं त्याला खरेदी केलं. 2014 ते 2021 पर्यंत त्याने बेंगळुरू संघासोबत 113 सामने खेळले आणि 139 विकेट घेतल्या आहेत. यादरम्यान त्याचा इकॉनॉमी रेट 7.58 होता. बेंगळुरूसाठी त्याची सर्वोत्तम गोलंदाजी 25 धावांत 4 विकेट्स घेतले आहेत.
हे देखील वाचा-