(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IPL Playoff 2022 : तीन संघाचे प्लेऑफचं आव्हान जवळपास संपलेच, पण...
IPL Playoff 2022 : आयपीएलचा 15 वा हंगाम उत्तरार्धाकडे झुकलाय तसा स्पर्धेतील रोमांच आणखी वाढत चालला आहे.
IPL Playoff 2022 : आयपीएलचा 15 वा हंगाम उत्तरार्धाकडे झुकलाय तसा स्पर्धेतील रोमांच आणखी वाढत चालला आहे. रविवारी आयपीएलच्या मैदानात दोन सामन्याचा थरार पाहायला मिळाला. पहिल्या सामन्यात आरसीबीने हैदराबादचा 67 धावांनी पराभव केला. तर दुसऱ्या सामन्यात चेन्नईने दिल्लीला 91 धावांनी मात दिली. चेन्नई आणि आरसीबीच्या विजयानंतर प्लेऑफमध्ये पोहचण्याचा रोमांच आणखी वाढला आहे. कोणते चार संघ प्लेऑफमध्ये पोहचणार याची चर्चा सुरु झाली आहे.
आरसीबी चौथ्या क्रमांकावर कायम -
आरसीबीने हैदराबादचा पराभव करत प्लेऑफच्या दिशेने आणखी एक पाऊल टाकलेय. आरसीबीने 12 सामन्यात सात विजय मिळवले आहेत 14 गुणांसह आरसीबी चौथ्या क्रमांकावर आहे. प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी आरसीबीला उर्वरित दोन्ही सामन्यात विजय मिळवावा लागणार आहे. एक विजय मिळवल्यास नेटरनरेटच्या आधारावर आरसीबीचा फैसला होईल. आरसीबीकडून मोठ्या फरकाने पराभव झाल्यामुळे हैदराबादचा नेटरनरेट खराब झालाय.
चेन्नई-कोलकात्याचा काय होणार?
दिल्लीला मोठ्या फरकाने हरवल्यानंतरही चेन्नईला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी इतर संघाच्या सामन्यावर अवलंबून राहावे लागणार आहे. चेन्नईच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा खूप कमी आहेत. दुसरीकडे मुंबईचा संघ प्लेऑफच्या स्पर्धेतून बाहेर गेलाय. प्लेऑफमधून बाहेर जाणारा मुंबई पहिला संघ आहे. कोलकात्याचाही प्लेऑफमध्ये पोहचण्याची शक्यता कमीच आहे. कोलकात्याला प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी चेन्नईप्रमाणे उर्वरित सामने मोठ्या फरकारने जिंकावे लागतील, त्याशिवाय इतर संघाच्या जय-पराजयावर अवलंबून राहावे लागणार आहे. मुंबई, कोलकाता आणि चेन्नई संघाचे प्लेऑफमधील आव्हान जवळपास संपुष्टात आलेय. चेन्नई आणि कोलकाता संघाच्या आशा जर तर वर अवलंबून आहेत.
गुजरात-लखनौ प्लेऑफसाठी पात्र -
हार्दिक पांड्याचा गुजरात टायटन्स आणि राहुलच्या नेतृत्वातील लखनौ सुपर जायंट्स यांचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित मानला जातोय. दोन्ही संघाने 8 सामने जिंकले आहे. लखनौ आणि गुजरातचे प्रत्येकी 16-16 गुण झाले आहेत. दोन्ही नव्या संघाची कामगिरी दर्जेदार आहे, या दोन्ही संघाचा प्लेऑफमधील प्रवेश निश्चित मानला जातोय.
गुणतालिकेत राहुलच्या नेतृत्वातील लखनौ संघ पहिल्या क्रमांकावर विराजमान आहे. लखनौने 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. गुजरातच्या संघानेही 11 सामन्यात 8 विजय मिळवले आहेत. नेटरनरेटच्या आधारावर लखनौचा संघ अव्वल स्थानावर आहे. राजस्थानचा संघ 14 गुणांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. राजस्थान संघाने 11 सामन्यात सात विजय मिळवले आहेत. सध्या लखनौ, गुजरात, राजस्थान आमि आरसीबी हे चार संघ गुणतालिकेत अव्वल चार क्रमांकावर आहेत. तर मुंबईचे प्लेऑफमधील आव्हान संपुष्टात आलेय. दिल्ली, हैदराबाद, पंजाब यांच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा आहे. तर कोलकाता आणि चेन्नईलाही संधी आहे, मात्र त्यांना इतर संघाच्या विजय आणि पराभवावर अवलंबून राहावे लागणार आहे.