(Source: ECI/ABP News/ABP Majha)
CSK vs MI, IPL 2023 : मुंबईची फलंदाजी ढेपाळली, चेन्नईला विजयासाठी 140 धावांचे माफक आव्हान
CSK vs MI, IPL 2023 : चेन्नईच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईची फलंदाजी ढेपाळली.
CSK vs MI, IPL 2023 : चेन्नईच्या भेदक गोलंदाजीसमोर मुंबईची फलंदाजी ढेपाळली. मुंबईने निर्धारित २० षटकात आठ विकेटच्या मोबदल्यात १३९ धावांपर्यंत मजल मारली. पथिराणा याने चेन्नईकडून सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. मुंबईच्या फंलदाजांनी ठरावीक अंताराने विकेट फेकल्या. नेहाल वढेराचे अर्धशतक वगळता एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही.
चेन्नईच्या चेपॉक मैदानावर धोनीने नाणेफेकीचा कौल जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. चेन्नईच्या गोलंदाजांनी धोनीचा हा निर्णय सार्थ ठरवला. पावरप्लेमध्ये मुंबईच्या तीन फलंदाजांना तंबूत पाठवले. पहिल्या चेंडूपासूनच चेन्नईच्या गोलंदाजांनी मुंबईच्या फलंदाजांना अडचणीत टाकले.
मुंबईकडून सलामीला ईशान किशन सोबत कॅमरुन ग्रीन मैदानात आला होता. पण मुंबईचा हा डाव अपयशी ठरला. कॅमरुन ग्रीनला तुषार देशपांडे याने त्रिफाळाचीत केले. दुसऱ्या क्रमांकावर आलेल्या कर्णधार रोहित शर्माला भोपळाही फोडता आला नाही. दीपक चहरच्या चेंडूवर रोहित शर्मा बाद झाला. ईशान किशनही सात धावा काढून बाद झाला. पावरप्लेमध्ये मुंबईने तीन महत्वाच्या विकेट गमावत फक्त ३४ धावा केल्या होत्या.
आघाडीचे फलंदाज बाद झाल्यानंतर सूर्यकुमार यादव आणि नेहाल वढेरा यांनी मुंबईचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. पण २६ धावांवर सूर्यकुमार यादव बाद झाला. जाडेजाने सूर्याला तंबूत पाठवले. सूर्या बाद झाल्यानंतर मुंबईच्या फलंदाजांनी पुन्हा एकदा एकापाठोपाठ एक विकेट फेकल्या. एका बाजूला विकेट पडत असताना दुसऱ्या बाजूला नेहाल वढेरा याने दमदार फलंदाजी केली.
नेहाल वढेरा याने अर्धशतकी खेळी केली. वढेरा याने ५१ चेंडूत ६४ धावांचे योगदान दिले. यामध्ये एक षटकार आणि आठ चौकार लगावले. नेहाल वढेराचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला तीस धावसंख्या गाठता आली नाही. टिम डेविड दोन धावांवर तंबूत परतला. अर्शद खान एका धाव काढून बाद झाला. ट्रिस्टन स्टब्स याने २१ चेंडूत २० धावा केल्या. मुंबईकडून फक्त एकमेव षटकार मारता आलाय.
चेन्नईच्या गोलंदाजांनी पहिल्या चेंडूपासूनच भेदक मारा केला. मुंबईच्या फलंदाजांना ठरावीक अंतराने बाद करत मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. मुंबईच्या फलंदाजांना एकही मोठी भागिदारी करु दिली नाही. चेन्नईकडून पथीराणा याने सर्वाधिक तीन विकेट घेतल्या. चार षटकार पथीराणा याने फक्त १५ धावा खर्च केल्या. दीपक चहर आणि तुषार देशपांडे यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. तर रविंद्र जाडेजा याने एक विकेट घेतली. तुषार देशपांडे याने पुन्हा एकदा पर्पल कॅपवर नाव कोरलेय.