(Source: ECI/ABP News/ABP Majha)
GT vs CSK, 1st Innings Highlights: साई सुदर्शनचा झंझावात, गुजरातची 214 धावांपर्यंत मजल
IPL 2023 Final, GT vs CSK: साई सुदर्शन आणि वृद्धीमान साहा यांची अर्धशतकी खेळी
IPL 2023 Final, GT vs CSK: साई सुदर्शन याच्या झंझावाती 96 धावांच्या बळावर गुजरातने निर्धारित 20 षटकात चार विकेटच्या मोबद्लयात 214 धावांपर्यंत मजल मारली. साई सुदर्शनशिवाय वृद्धीमान साहा याने 54 धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून मथिशा पथीराना याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. चेन्नईला विजयासाठी 215 धावांचे आव्हान आहे.
महामुकाबल्यात चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. नरेंद्र मोदी स्टेडिअवर गुजरातच्या फलंदाजांनी दमदार सुरुवात केली. वृद्धीमान साहा आणि शुभमन गिल यांनी वादळी सुरुवात केली. प्रतिषटक 10 च्या सरासरीने धावांचा पाऊस पाडला. साहा आणि गिल या जोडीने 67 धावांची सलामी दिली. रविंद्र जाडेजा याने शुभमन गिल याला बाद करत ही जोडी फोडली. शुभमन गिल याने 20 चेंडूत 39 धावांचे योगदान दिले. यामध्ये सात चौकारांचा समावेश होता.
शुभमन गिल अवघ्या तीन धावांवर असताना दीपक चाहर याने सोपा झेल सोडला. तुषार देशपांडे याच्या गोलंदाजीवर गिल याचा झेल उडाला होता. पण चाहर याला झेल टिपता आला नाही. त्यानंतर गिल याने चौफेर फटकेबाजी केली. शुभमन गिल याने गोलंदाजांचा समाचार घेतला. दुसऱ्या बाजूला वृद्धीमान साहा यानेही फटकेबाजी केली. गिल 39 धावांवर बाद झाला. त्यानंतर सर्व सुत्रे वृद्धीमान साहा याने स्विकारली. साई सुदर्शन याने साहा याला चांगली साथ दिली. साहा आणि सुदर्शन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 42 चेंडूत 64 धावांची भागिदारी केली. साहा आणि सुदर्शन यांनी चौफेर फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला. चेन्नईचे गोलंदाज हतबल झाले होते. दीपक चाहर याने वृद्धीमान साहा याला बाद करत ही जोडी फोडली.
वृद्धीमान साहा याने 54 धावांची वादळी अर्धशतकी खेळी केली. या खेळीमध्ये साहा याने पाच चौकार आणि एक षटकार लगावला. साहा याने गिल याच्यासोबत पहिल्या विकेटसाठी 67 धावांची भागिदारी केली. त्यानंतर साई सुदर्शनसोबत 64 धावांची भागिदारी करत गुजरातच्या डावाला आकार दिला. साई सुदर्शन याने हार्दिक पांड्याच्या साथीने गुजरातची धावसंख्या वाढली. साई सुदर्शन आणि हार्दिक पांड्या या जोडीने 33 चेंडूत 81 धावांची भागिदारी केली. यामध्ये साई सुदर्शन याने 22 चेंडूत 60 धावांची खेळी केली.
साई सुदर्शन याने सुरुवातीला संयमी फलंदाजी केली. त्यानंतर आक्रमक फलंदाजी करत धावसंख्येला आकार दिला. साई सुदर्शन याने मोक्याच्या सामन्यात 33 चेंडूत अर्धशतक झळकावले. त्यानंतर हार्दिक पांड्यासोबत गुजरातला फिनिशिंग टच दिला. साई सुदर्शन याने धमदार 96 धावांची खेळी केली. साई सुदर्शन याने 47 चेंडूत झंझावाती 204 च्या स्ट्राईक रेटने 96 धावा चोपल्या. यामध्ये सहा षटकार आणि आठ चौकाराचा समावेश होता. हार्दिक पांड्या याने नाबाद 21 धावांची खेळी केली. दरम्यान,
चेन्नईकडून पथिराना याने सर्वाधिक दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय दीपक चाहर आणि रविंद्र जाडेजा यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली.