फिरकीच्या जाळ्यात अडकली चेन्नई, पंजाबसमोर 163 धावांचे आव्हान
Chennai Super Kings vs Punjab Kings IPL 2024 : चेपॉक स्टेडियम चेन्नईचा संघ पंजाबच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. पंजाबच्या भेदक माऱ्यापुढे चेन्नईनं सात विकेटच्या मोबदल्यात 162 धावांपर्यंत मजल मारली.
Chennai Super Kings vs Punjab Kings IPL 2024 : चेपॉक स्टेडियम चेन्नईचा संघ पंजाबच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. पंजाबच्या भेदक माऱ्यापुढे चेन्नईनं सात विकेटच्या मोबदल्यात 162 धावांपर्यंत मजल मारली. चेन्नईकडून ऋतुराज गायकवाड यानं 62 धावांची खेळी केली. त्याचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला तिशी ओलांडता आली नाही. पंजाबकडून हरप्रीत ब्रार आणि राहुल चाहर यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय मधल्या षटकात त्यांनी चेन्नईच्या धुरंधरांना बांधून ठेवलं. पंजाबला विजयासाठी 163 धावांची गरज आहे.
चेन्नईचा कर्णधार सॅम करन यानं नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. घरच्या मैदानावर चेन्नईच्या सलामी फलंदाजांनी शानदार सुरुवात केली. अजिंक्य रहाणे आणि ऋतुराज गायकवाड यांनी वादळी सुरुवात दिली. दोघांनी पहिल्या विकेटसाठी 64 धावांची शानदार भागिदारी केली. हरप्रीत ब्रार यानं ही मराठमोळी जोडी फोडली. अजिंक्य रहाणे यानं 24 चेंडूमध्ये पाच चौकाराच्या मदतीने 29 धावांचं योगदान दिलं. रहाणे तंबूत परतल्यानंतर धावगती वाढवण्यासाठी शिवम दुबेला बढती देण्यात आली. पण दुबे याला मोठी खेळी करता आली नाही. चेन्नईच्या फलंदाजांनी ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. शिवम दुबे याला खातेही उघडता आले नाही. दुबेनंतर रवींद्र जाडेजाही फार काळ तग धरु शकला नाही. तोही फक्त दोन धावा काढून बाद झाला. चेन्नईने लागोपाठ तीन विकेट गमावल्या, त्यामुळे कर्णधार ऋतुराज गायकवाड यानं संयमी फलंदाजी सुरु केली.
ऋतुराज गायकवाडने समीर रिझवी याच्यासोबत एकेरी दुहेरी धावसंख्यावर भर दिला. मधल्या षटकात पंजाबच्या फिरकी गोलंदाजांनी चेन्नईच्या फलंदाजांना बांधून ठेवलं. समीर रिझवी यानं 23 चेंडूत 21 धावा जोडल्या. त्याला इम्पॅक्ट पाडता आला नाही. तर मोईन अली यानं 15 धावांची खेळी केली. मोईन अली याच्यासोबत गायकवाडनं 38 धावांची भागिदारी केली. तर समीर रिझवीसोबत 37 धावा जोडल्या.
ऋतुराज गायकवाड यानं कर्णधाराला साजेशी खेळी केली. ऋतुराजने षटकार ठोकत आपलं अर्धशतक ठोकलं. ऋतुराज गायकवाड यानं 48 चेंडूमध्ये 62 धावांची खेळी केली. या खेळीमध्ये त्यानं दोन षटकार आणि पाच चौकार ठोकले. ऋतुराज गायकवाड यानं या अर्धशतकी खेळीसह ऑरेंज कॅपवर कब्जा केलाय. विराट कोहलीकडून त्यानं ऑरेंज कॅप हिसकावली. ऋतुराज गायकवाडच्या नावावर 509 धावांची नोंद झाली आहे. विराट कोहीलच्या नावावर 500 धावा आहेत.
अखेरच्या दोन षटकात पंजाबच्या गोलंदाजांनी धोनीची बॅट शांतच ठेवली. धोनीने मोठे फटके मारण्याचा प्रयत्न केला, पण त्याला यश आले नाही. धोनीनं 14 धावांचं योगदान दिलं. चेन्नईनं 162 धावांपर्यंत मजल मारली. पंजाबकडून राहुल चाहर आणि हरप्रीत ब्रार यांनी भेदक मारा केला. दोघांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. रबाडा आणि अर्शदीप यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली.