राहुल-राशिदच्या वादळापुढे उमरानची गोलंदाजी फिकी, गुजरातचा पाच गड्यांनी विजय
IPL 2022 : राहुल तेवातिया आणि राशिद खान यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर गुजरातने हैदराबादचा पाच गड्यांनी पराभव केला आहे.
IPL 2022 : राहुल तेवातिया आणि राशिद खान यांच्या वादळी फलंदाजीच्या जोरावर गुजरातने हैदराबादचा पाच गड्यांनी पराभव केला आहे. राहुल-राशिद यांच्या विस्फोटक खेळीच्या बळावर गुजरात संघाने हैदराबादने दिलेल्या 196 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला. गुजरातने निर्धारित 20 षटकात पाच गड्यांच्या मोबदल्यात 199 धावा केल्या. अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात गुजरातने बाजी मारली. राशिद खान याने तुफानी फटकेबाजी करत सामना फिरवला. या विजयासह गुजरातच्या संघाने गुणतालिकेत अव्वल स्थान मिळवलेय. गुजरातने आठ सामन्यात सात विजय नोंदवले आहेत.
हैदराबादने दिलेल्या 196 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातची सुरुवात सन्माजनक झाली. गिल आणि साहा यांनी 69 धावांची सलामी दिली. उमरान मलिक याने भेदक मारा करत गुजरातच्या अडचणी वाढवल्या. उमरान मलिकने चार षटकात पाच विकेट घेतल्या. उमरान मलिकशिवाय एकाही गोलंदाजाला यश मिळाले नाही. गुजरातकडून साहाने सर्वाधिक 68 धावांची खेळी केली. त्याशिवाय राहुल तेवातियाने 40 तर राशिद खान याने 31 धावांची नाबाद खेळी करत गुजरातला विजय मिळवून दिला. गिल 22, हार्दिक पांड्या 10, डेविड मिलर 17 आणि अभिनव मनोहर 0 यांना मोठी खेळी करण्यात अपयश आले.
प्रथम फंलदाजी करताना अभिषेक शर्मा (65) आणि मार्करम (56) यांच्या अर्धशतकाच्या बळावर हैदराबादने निर्धारित 20 षटकात सहा गड्यांच्या मोबदल्यात 195 धावा केल्या. गुजरातचा कर्णधार हार्दिक पांड्याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मोहम्मद शमीने भेदक मारा करत सुरुवातीलाच केन विल्यमसन आणि राहुल त्रिपाठीला बाद केले. पण अभिषेक शर्मा आणि मार्करम जोडीने गुजरातची गोलंदाजी फोडली. कर्णधार केन विल्यमसन 5 तर राहुल त्रिपाठी 16 धावा करुन तंबूत परतल्यानंतर गुजरात मजबूत स्थितीत वाटत होते. पण मग अभिषेक शर्मा आणि एडन मार्करम यांनी दमदार फटकेबाजी करत संघाचा डाव सावरला. शर्माने 42 चेंडूत 6 चौकार आणि 3 षटकार ठोकत 65 धावा केल्या. तर मार्करमने 40 चेंडूत 2 चौकार आणि 3 षटकार ठोकत 56 धावा केल्या. या दोघांच्या भक्कम भागिदारीनंतर अखेरच्या षटकात युवा खेळाडू शशांक सिंह याने अनुभवी लॉकी फर्ग्यूसन याला फटकेबाजी करत लागोपाठ तीन षटकार खेचले ज्यामुळे हैदराबादने 195 धावांपर्यंत मजल मारली. गुजरातकडून मोहम्मद शमीने उत्तम सुरुवात केली. त्याने सर्वाधिक तीन विकेट्सही घेतल्या. याशिवाय जोसेफ आणि यश यांनीही प्रत्येकी एक विकेट घेतली. पण दिग्गज गोलंदाज राशिद आणि लॉकी हे मात्र आज महाग पडले राशिदने चार षटकात 45 तर लॉकीने चार षटकात 52 धावा दिल्या.