T20 World Cup 2026 : मुंबईत टी 20 वर्ल्ड कपची सेमी फायनल, अंतिम फेरीचा सामना अहमदाबादमध्ये, वर्ल्ड कपला 'या' दिवशी सुरुवात?
T20 World Cup 2026 Schedule: पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. या वर्ल्ड कपची पहिली मॅच आणि फायनल अहमदाबादमध्ये होणार आहे.

मुंबई : भारत आणि श्रीलंका पुढील वर्षी होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कपचं संयुक्तपणे आयोजन करणार आहेत. वर्ल्ड कपचा अंतिम सामना, उपांत्य फेरीचा सामना आणि स्पर्धेच्या सुरुवातीचा सामना कुठं होणार यासंदर्भात माहिती समोर आली आहे. द इंडियन एक्स्प्रेसच्या मते वर्ल्ड कपमधील पहिली मॅच आणि अंतिम फेरीचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर होणार आहे. एका उपांत्य फेरीच्या लढतीचं आयोजन मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर केलं जाणार आहे. टी 20 वर्ल्ड कप 7 फेब्रुवारी ते 8 मार्च दरम्यान होणार आहे, अशी माहिती आहे.
T 20 World Cup Venue : टी 20 वर्ल्ड कपची फायनल अहमदाबादमध्ये
अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये यापूर्वी 2023 मध्ये वर्ल्ड कपच्या उद्घाटनाचा आणि फायनलचा सामना झाला होता. द इंडियन एक्स्प्रेसनुसार भारत आणि पाकिस्तान यांच्यात सेमी फायनल मॅच झाल्यास ती कोलंबोत खेळवली जाईल. तर, दुसरी उपांत्य फेरीची लढत मुंबईत होईल.
श्रीलंका भारतासह या टी 20 वर्ल्ड कपचा सह आयोजक आहे. टी 20 वर्ल्ड कप दोन्ही देशातील मिळून 7 स्टेडियमवर खेळवला जाईल. भारतातील सामने चेन्नई, दिल्ली, मुंबई, अहमदाबाद आणि कोलकाता येथे होऊ शकतात. तर श्रीलंकेत 3 मैदानावर सामने होण्याची शक्यता आहे. रिपोर्टनुसार प्रेमदासा स्टेडियम, पल्लेकेले आणि दाम्बुला किंवा हम्बनटोटा पैकी एका मैदानाची निवड केली जाऊ शकते.
सराव सामन्याची ठिकाणांबाबात अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. बंगळुरुमध्ये काही सराव सामने होऊ शकतात. भारताचे सामने दिल्ली, कोलकाता, चेन्नई आणि मुंबईत होऊ शकतात. आयसीसी पुढील काही दिवसात टी 20 वर्ल्ड कपचं वेळापत्रक जाहीर करु शकतं.
या रिपोर्टनुसार बीसीसीआयच्या काही उच्च अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. त्या बैठकीत वनडे वर्ल्ड कपचं जितक्या मैदानांवर आयोजन करण्यात आलं होतं, त्यापेक्षा कमी मैदानांमध्ये मॅचेसचं आयोजन करण्यात यावं, अशी चर्चा करण्यात आली आहे. टी 20 वर्ल्ड कपचे 6 सामने प्रत्येक मैदानावर होऊ शकतात.
पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचल्यास फायनल कोलंबोत
भारत आणि पाकिस्तानमधील राजकीय संबंध ताणलेले आहेत. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानं स्थिती आणखी बिघडली आहे. 2023 च्या वनडे वर्ल्ड कपला पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. मात्र, पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानचे आयसीसी स्पर्धांमधील सामने त्रयस्थ ठिकाणी खेळवण्याचा निर्णय झालेला आहे. पाकिस्तानचे टी 20 वर्ल्ड कपमधील सामने श्रीलंकेत होणार आहेत. नुकत्याच पार पडलेल्या आयसीसी महिला वनडे वर्ल्ड कपमध्ये देखील पाकिस्तानचे सामने श्रीलंकेत झाले होते.




















