India vs England : पहिल्या सामन्यात महागडा ठरला चहल, तरी केला 'हा' रेकॉर्ड
टीम इंडियाचा इंग्लंडने आठ विकेट्सने पराभव केला. टीम इंडियाने दिलेलं 125 धावांचं आव्हान इंग्लंडने सहज पूर्ण केलं.या सामन्यात टीम इंडियाला पराभव स्वीकारावा लागला असला तरी काही रेकॉर्ड्स देखील झाले आहेत.
Ind vs Eng first T20 : इंग्लंडच्या संघाला कसोटी मालिकेमध्ये नमवल्यानंतर भारतीय क्रिकेट संघ नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये उतरला. पण, या सामन्यात टीम इंडियाचा इंग्लंडने आठ विकेट्सने पराभव केला. सामन्याच्या सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांनी भारतीय फलंदाजांच्या नाकी नऊ आणल्याचं पाहायला मिळालं. टीम इंडियाने दिलेलं 125 धावांचं आव्हान इंग्लंडने सहज पूर्ण केलं. या सामन्यात भारताचा गोलंदाज युजवेंद्र चहल महागडा ठरला. मात्र त्यानं एक नवा विक्रम केला आहे.
युजवेंद्र चहल सर्वाधिक विकेट्स घेणारा भारतीय
लेग स्पिनर युजवेंद्र चहल या सामन्यात चांगलाच महाग ठरला. त्यानं चार षटकांमध्ये 44 धावा देऊन एक विकेट घेतली. मात्र या सामन्यात त्यानं एक विक्रम केला. चहल भारताकडून टी20 मध्ये भारताकडून सर्वाधिक विकेट्स घेणारा खेळाडू ठरला आहे. चहलच्या नावावर आता टी 20 मध्ये 60 विकेट्स झाल्या आहेत. त्यानं जसप्रीत बुमराह( 59) ला मागे सोडलं आहे.
पहिल्यांदाच क्लिन बोल्ड झाले भारताचे दोन्ही सलामीवीर
या सामन्यात पहिल्यांदाच भारताचे दोन्ही ओपनर्स केएल राहुल (01) आणि शिखर धवन (04) क्लिन बोल्ड झाले. राहुलला जोफ्रा आर्चर आणि धवनला मार्क वुडनं बोल्ड केलं. टी20 इंटरनॅशनल क्रिकेटच्या इतिहासात पहिल्यांदाच असं झालं ज्यावेळी दोन्ही सलामीवीर बोल्ड झाले.
इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सलग दोन वेळा शून्यावर आऊट झाला विराट
या सामन्यात विराट कोहली शून्यावर बाद झाला. त्याला आदिल रशीदनं विराटला बाद केलं. याआधी इंग्लंडविरोधातील चौथ्या टेस्टमध्ये कोहली शून्यावर बाद झाला होता. आपल्या करियरमध्ये तो सलग दुसऱ्यांदा शून्यावर बाद झाला.
श्रेयस अय्यरचं अर्धशतक
संघाचा डाव गडगडत असताना श्रेयस अय्यरनं मात्र एका बाजूने चांगली खेळी करत त्याचं अर्धशतक पूर्ण केलं. त्याच्या अर्धशतकाच्या बळावर संघानं 20 षटकांमध्ये 124 धावा केल्या. परिणामी इंग्लंडच्या संघाला भारतानं 125 धावाचं आव्हान दिलं. भारताचं आव्हान स्वीकारत मैदानात आलेल्या इंग्लंडनं संयमी खेळी करत इंग्लंडच्या फलंदाजांनी अतिशय सहजपणे अवघे 2 गडी गमावत भारतीय संघाचा पराभव केला. टी20 मालिकेची विजयी सुरुवात करणाऱ्या इंग्लंडच्या संघाने मालिकेत 1-0 अशी आघाडी मिळवली आहे.