एक्स्प्लोर
Ind vs NZ | पहिल्या दहा षटकात सर्वात कमी धावांचा विक्रम भारताच्या नावे
पहिल्या दहा षटकांमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम भारताच्या नावे जमा झाला आहे. भारताने पहिला पॉवरप्ले समाप्त होईपर्यंत चार गडी गमावून 24 धावा केल्या होत्या.
मुंबई : विश्वचषकाच्या पहिल्या उपान्त्य फेरीत न्यूझीलंडने भारताचा 18 धावांनी पराभव करत अंतिम फेरीत मजल मारली. रोहित शर्मा, के एल राहुल या सलामीवीरांसोबतच कर्णधार विराट कोहली स्वस्तात माघारी परतल्यानंतर भारताच्या फायनलचं तिकीट मिळवण्याच्या आशा धूसर झाल्या होत्या. त्याचवेळी भारताने यंदाच्या विश्वचषकात एक नकोसा विक्रमही नोंदवला.
पहिल्या दहा षटकांमध्ये सर्वात कमी धावा करण्याचा विक्रम भारताच्या नावे जमा झाला आहे. सुरुवातीच्या 10 षटकांमध्ये 27 धावा करण्याचा न्यूझीलंडचा विक्रम टीम इंडियाने मागे टाकला. भारताने पहिला पॉवरप्ले समाप्त होईपर्यंत चार गडी गमावून 24 धावा केल्या होत्या.
इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषकात मँचेस्टरमधील ओल्ड ट्रॅफर्ड मैदानावर भारत आणि न्यूझीलंड या संघांमध्ये काल (बुधवारी) उपान्त्य सामन्याला सुरुवात झाली. पावसाच्या व्यत्ययामुळे काल न्यूझीलंड 46.1 षटकांत पाच बाद 211 धावांवर खेळत असताना सामना थांबवण्यात आला. उर्वरित सामना दुसऱ्या दिवशी सुरु झाला, तेव्हा न्यूझीलंडने आणखी तीन विकेट गमावत 50 षटकात 239 धावांपर्यंत मजल मारली.
न्यूझीलंडने दिलेल्या 240 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगलीच अडखळत झाली. हेन्री आणि बोल्ट यांनी भारताच्या सलामीवीरांची जोडी फोडल्यामुळे संघाची चांगलीच दाणादाण उडाली. राहुल, रोहित आणि विराट हे तिघेही प्रत्येकी एक धाव करुन तंबूत परतल्यामुळे तीन षटकांनंतर भारताची अवस्था तीन बाद पाच अशी केविलवाणी झाली होती.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात सलामीचे तिन्ही फलंदाज अवघी एक धाव करुन पॅव्हिलियनमध्ये परतण्याची ही पहिलीच वेळ होती. त्यानंतर सहा धाव करुन दिनेश कार्तिकही माघारी गेल्यामुळे दहा षटकांच्या अखेरीस भारताची स्थिती चार बाद 24 अशी झाली होती.
रवींद्र जाडेजाने 77 धावा आणि महेंद्रसिंह धोनीने अर्धशतकी खेळी करत भारतीय संघाच्या आशा पुन्हा पल्लवित केल्या होत्या. मात्र मार्टिन गप्टिलने धोनीला रनआऊट करत भारताच्या उरल्यासुरल्या अपेक्षांच्या ठिकऱ्या उडवल्या.
न्यूझीलंडने विश्वचषकाच्या अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे, तर भारताचं विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आलं आहे. साखळी फेरीत नऊपैकी सात सामने जिंकत, 15 गुण मिळवून अव्वल ठरत भारताने उपान्त्य फेरीत शानदार एन्ट्री घेतली होती. मात्र उपान्त्य फेरीतच विश्वचषकातून बाहेर पडण्याची वेळ भारतावर आली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
महाराष्ट्र
राजकारण
महाराष्ट्र
Advertisement